महत्वाच्या बातम्या

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात वाचन प्रेरणा दिन साजरा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंंद्र येथे ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि वुमेन्स स्टडीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचे महान शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख तथा वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक वैशाली गुडधे आदि उपस्थित होते.
या प्रसंगी वाचन संस्कृती या विषयावर बोलतांना प्रमुख वक्ता किशोर देशमुख म्हणाले की, बदलत्या काळात डिजिटल माध्यमांना महत्त्व आले, सोशल मीडियावर व्यर्थ गुंतवणूक वाढली अशा स्थितीत वाचन संस्कृतीवर निश्चितच परिणाम झाला. काही प्रमाणात पुस्तक वाचण्याऐवजी डिजिटल माध्यमातून वाचन होत आहे, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. पुस्तक वाचणे आणि एकाग्र चित्ताने हेतुपूर्वक पुस्तक वाचणे यात तफावत आहे. हेतुपूर्वक वाचनातून माहिती आणि ज्ञानाची अधिक चांगली उपलब्धी वाचकास होते. वाचन म्हणजे प्रवास होय. व्यक्तीमधील विश्वास, शक्ती, विचार, कल्पना, संवेदनशीलता, ज्ञान आणि बुद्धीचा विकास होय.
बुक टॉक स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून ग्रंथसंच प्रदान
कार्यक्रमाच्या निमित्ताने बुक टॉक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुबोध धुरंधर, द्वितीय सोपान चाचणे, तृतीय क्रमांक निशिगंधा सोनोने या विद्यार्थ्यांना मिळविला. विजेत्याा विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून मान्यवरांच्या हस्ते ग्रंथसंच भेट देण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना डॉ. वैशाली गुडधे म्हणाले, निरंतर वाचनासाठी स्वत:मध्ये सवयी रुजविणे आवश्यक आहे. वाचनासाठी दिवसातील एक निश्चित वेळ ठरवावा, एकाग्र चित्ताने वाचावे, चिकाटी व आवड जपावी, पुस्तकांची यादी करावी, जेणेकरुन वेळ मिळला की त्याचे वाचन करता येऊ शकेल.
अध्यक्षीय भाषणात ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक मोहन खेरडे म्हणाले, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. शासनाने म्हणूनच त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निणय घेतला. त्यादृष्टीने ज्ञानस्त्रोत केंद्राद्वारे दरवर्षी वाचन विषय केंद्रस्थानी ठेवून अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वाचनाची कला ही सर्वांनीच आत्मसात करावी व आपल्यामधील सर्वांगीण विकास घडवून आणावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक ग्रंथपाल विशाल बापते यांनी, सूत्रसंचालन ग्रंथालय सहायक ज्योती गेडाम, तर आभारप्रदर्शन तृशाल गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos