महत्वाच्या बातम्या

 ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार


- इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य
- मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार 
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पुढील काही वर्षात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा सी लिंक असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत असून त्याद्वारे गुंतवणुकीच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी वेस्टमिडलँडमधील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत एकमेकांशी गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
लंडनपासून जवळच वेस्टमिडलँड हे राज्य वसलेले आहे. जॅग्वार, कॅडबरी आणि जेसीबीसारख्या प्रतिष्ठित कंपन्या या भागातील आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक मराठी तरुणांनी स्टार्टअपद्वारे या राज्यात आपल्या कंपन्या सुरू केल्या असून त्यांना स्थानिक प्रशासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे दोन देशांप्रमाणे दोन राज्यामध्ये गुंतवणूक विषयकसंबंध अधिक वाढावेत अशी मागणी या बैठकीत वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
वेस्टमिडलँड राज्य हे इलेक्ट्रिक व्हेईकल्स क्षेत्रातले मोठे हब असून त्यादृष्टीने राज्यात नवीन गुंतवणूक येण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासोबतच मुंबई ते बर्मिंगहम थेट विमानसेवा सुरू झाल्यास या दोन राज्यात पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो ही बाबही अँडी स्ट्रीट यांनी निदर्शनास आणून दिली, त्यावर ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे नक्की पाठपुरावा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.
वेस्टमेन्सलँड येथे बोरिक कॅसल, एजबर्स्टन क्रिकेट ग्राउंड, एमस्टरडम येथील सुप्रसिद्ध केनॉल अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या जागा भारतीय पर्यटकांना पहाता येथील त्यामुळे पर्यटनात मोठ्या संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असून त्यांना देखील या दोन राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास या तीन क्षेत्रात महाराष्ट्र आणि वेस्टमिडलँड यांनी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला इयन ब्रूकफिल्ड, एलन गेमेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, नील रामी, बेथ येट्स, अभिजित आफले, आशुतोष चंद्रा हेदेखील उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos