महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य व राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांच्या पूर्व तयारीबाबत आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत तर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २ ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, श्याम वाखर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. विजय इंगोले, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात १४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींची राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत तर १९ वर्षाखालील मुला- मुलींची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २ ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. या दोन्ही स्पर्धेत राज्यातून अंदाजे ४ हजार खेळाडू, पंच, पदाधिकारी, मार्गदर्शक व व्यवस्थापकांची उपस्थिती असणार आहे. यादरम्यान खेळाडूंना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा विभागाने नियोजन करावे, यासाठी संबंधित विभागांनी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अंदाजे दीड हजार तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी अडीच हजार मुले-मुली खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापक सहभागी होणार आहे. त्यांच्या निवासस्थानासाठी सैनिक स्कूल, आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह, समाज कल्याण विभागाची वस्तीगृहे आदींना भेटी द्याव्यात. त्यासोबतच, शहरातील शासकीय वसतिगृहे, विश्रामगृहांची यादी तयार करावी व तेथील कॅपॅसिटी तपासून खेळाडूंच्या निवासाचे नियोजन करावे.

महानगरपालिकेमार्फत शौचालयाची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, कचऱ्याचे व्यवस्थापन आदींची व्यवस्था करावी. सुरक्षेसंदर्भात रामनगर व बल्लारपूर पोलीस स्टेशनची मदत घ्यावी. तसेच पाणीपुरवठासाठी वॉटर टँकर बल्लारपूर नगरपालिकेकडून उपलब्ध करून घ्यावे. त्यासोबतच अतिरिक्त पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावे. आरोग्य विभागाने ॲम्बुलन्ससह आरोग्य सुविधा व डॉक्टरांची चमू उपलब्ध ठेवावी. त्यासोबतच स्पर्धेकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेगवेगळे प्लॅन करुन सुधारित निधी मागणी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना क्रीडा विभागास दिल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos