आरमोरी नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांची एकाधिकारशाही शहराच्या विकासास मारक


- पत्रकार परिषदेत प्रशांत मोटवणी व काँग्रेस कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या पाच कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करतांना आरमोरी नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांनी  काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता एकाधिकारशाहीचा वापर करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीचे नियोजन पायाभूत सुविधांवर न करता अनावश्यक बाबीवर खर्च करण्याचे नियोजन केले. ही  नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांची एकाधिकारशाही शहराच्या विकासाला मारक आहे असा खळबळजनक आरोप आरमोरी नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेता प्रशांत मोटवानी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
 पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मोटवाणी म्हणाले की वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीचे नियोजन करतांना सत्ताधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात न घेता अंधारात ठेवून कामाचे नियोजन केले.या नियोजनातून सत्ताधिकाऱ्यांनी आरमोरी - ब्रह्मपुरी मार्गावर वैनगंगा नदीच्या काठावर स्वागत गेट बांधकामासाठी ६० लाख रुपयाचे नियोजन केले आहे. वास्तविक पाहता हे ६० लाख रुपये आरमोरी शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर खर्च झाल्यास शहराचा थोडाफार विकास होईल. परंतु सत्ताधिकाऱ्यांनी ही महत्त्वाची गंभीर बाब लक्षात न घेता स्वागत गेटचे नियोजन करून जनतेची दिशाभूल केली आहे. या स्वागत गेटचा जनतेला काहीही फायदा नसून पैशाची उधळपट्टी करणारा नियोजन आहे. तसेच या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या नियोजनात पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर  बगीचा व ग्रीन जिम तयार करण्यासाठी एक कोटी रुपयाचे नियोजन सत्ताधिकाऱ्यांनी केले आहे. वास्तविक पाहता ही जागा आरमोरी गडचिरोली या राज्यमार्गावर लागून असून या जागेवर नगरपरिषदेची दुकान चाळ, सभागृह किंवा मंगल कार्यालयाची उभारणी करण्याचे नियोजन केले असते तर भविष्यात अनेकांना रोजगार मिळेल व यातूनच नगरपरिषदेचे उत्पन्न वाढेल परंतु असे न करता सत्ताधिकाऱ्यांनी निधीच्या उधळपट्टीचा कार्यक्रम आखला आहे. 
  पुढे बोलताना मोटवाणी म्हणाले की,  मागील सात महिन्यापासून सत्ताधिकाऱ्यांनी नियोजन समितीची व अन्य इतर समित्यांची बैठक बोलावली नाही. प्रभाग क्रमांक ७,प्रभाग क्र.४ व ५ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक असून या प्रभागांमध्ये अद्यापर्यंत कोणतीही कामे दिलेली नाही. ज्या ज्या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्याठिकाणी कामाचे कोणतेही नियोजन सत्ताधिकाऱ्यांनी केले नाही. प्रभाग क्रमांक ७ मध्ये अरसोडा हे गाव येत असून येथील ग्रामपंचायत चा रेकॉर्ड आरमोरी नगरपरिषद मध्ये समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नगरपरिषद कडून महत्त्वपूर्ण दाखले सुद्धा मिळत नाहीत. या प्रभागांमधील अद्यापही नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. नुकतेच लावलेले स्ट्रीटलाइट बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या प्रभागाचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.अद्यापर्यंत या प्रभागाला नगरपरिषद कडून कुठलाही निधी प्राप्त झाला नाही. आरमोरी नगर परिषदेच्या अनेक प्रभागात तीन-तीन दिवस घंटागाडी येत नाही. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. नगरपरिषद कडे अनेकदा तक्रारी करूनही तक्रारीचे निवारण केले जात नाही, त्यामुळे नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यांचे पूर्णपणे नियोजन बिघडले असून,नियोजनाचा अभाव दिसत आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे .
 काँग्रेसचे युवानेते तेजस मडावी म्हणाले की,  येथील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे मागील सहा वर्षापासून घरकुल धारकांना घरकुल मिळाले नाही. त्यामुळे अनेक गरीब व गरजू लोकांना उघड्यावर राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे आरमोरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र ,मृत्यु प्रमाणपत्र ,नमुना आठ, ना हरकत प्रमाणपत्र ,वारसान प्रमाणपत्र, बांधकाम प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी प्रचंड फी ची वाढ करून गोरगरीब , सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोपही या वेळी केला.
   यावेळी पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेता प्रशांत मोटवाणी, नगरसेविका दुर्गा लोणारे, नगरसेविका कीर्ती पत्रे, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदू खानदेशकर, शालिक पत्रे, सौरभ जक्कनवार, संजय लोणारे उपस्थित होते.
    याबाबत नगर परिषद चे अध्यक्ष पवन नारनवरे व उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की सर्व नगरसेवकांना विचारूनच आपण कामाचे नियोजन केले आहे. वैनगंगा नदीवर होणारा स्वागत गेट वैशिष्ट्यपूर्ण निधीतून होणार असून हा गडचिरोली जिल्ह्याचा प्रवेश द्वार आहे. अनेक दिवसापासून आरमोरी शहरात भव्य बगीचा भावा ही जनतेची मागणी होती.  जनतेच्या मागणीनुसारच बगीच्याची निर्मिती होणार आहे. प्रभाग क्रमांक ५ व ६ साठी दलित वस्तीचा दोन कोटी रुपयाचा निधी नियोजित केला आहे. १४ वा वित्त आयोग ,नगरोत्थान योजनेतून संपूर्ण आरमोरी शहरात रस्ते व नाल्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवकांना हाताशी धरूनच व त्यांना विचारूनच कामे प्रस्तावित केली आहेत, यात आपण कुठल्याही पक्षाचे असो ,असा कुठलाही दुजाभाव केला नाही त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-09


Related Photos