शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम


-  शेतकऱ्यांना अडचणी येवू नयेत याची खबरदारी घेण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर जाउन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांना खरिप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी.  शेतकऱ्याना अपघात विमा/ पिक विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश  पालकमंत्री ना.  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी आज दिले.  खरिप हंगाम 2018-19 चा आढावा व 2019-20 चे नियोजन याची माहिती आज या  बैठकीत त्यांनी जाणून घेतली. 
  या बैठकीस जिल्हापरिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे,  अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे ,  प्रकल्प संचालक (आत्मा) प्रकाश पवार, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी अनंत पोटे, उप विभागीय कृषि अधिकारी  प्रिती हिरळकर, तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे, लिड बँकेचे व्यवस्थापक भोसले  हे प्रामुख्याने उपस्थित होते.
   प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी खात्याने अधिक प्रयत्न करावेत असे सांगून पालकमंत्री   म्हणाले की, याबाबत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याची माहिती पोहचेल यादृष्टीने  प्रयत्न करण्यात यावे. यामध्ये पत्रके, कलापथक आदीव्दारे जनजागृती करावी असेही ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचा उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेतील कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांनी / अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत योजनांची माहिती, शेतीविषयक माहिती त्यांच्या बांधावर कशी पोहचेल याचा प्रयत्न करावेअसे निर्देश  पालकमंत्री आत्राम यांनी दिले.

  २०१८ - १९ चा आढावा

जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे.  गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 अर्थात 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता.  सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची  तालुका क्षेत्रात झाला.
 जिल्हयात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.  सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती.  कापूस 14 हजार , तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर  अशी एकूण 115 टक्के पेरणी झाली होती.
  भात पिकावर पाने गुंडाळणारी अळी  तसेच तुडतुडे यांचा प्रभाव दिसून आला.  यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने 50 टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा केला होता.

 खरिपाचे नियोजन

जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र 1.5 लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात 1.82 लाख हेक्टरवर (119 टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या 2019-20 च्या खरिप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
 कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे.  या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन 55 टक्के अधिक मिळते.

कापसाचे क्षेत्र वाढतेय

 जिल्हयात चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांमध्ये साधारणपणे सोयाबीनची लागवड होते याचे एकूण क्षेत्र 5646 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात केवळ 7 टक्के अर्थात 393 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती.
  जिल्हयात सोयाबीनचे क्षेत्र घटत असून कापसाच्या लागवडीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  जिल्हयातील कपाशीचे एकूण क्षेत्र 4459 हेक्टर असले तरी गेल्या खरिप हंगामात 14000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली.  हे क्षेत्र 9541 हजार हेक्टरने वाढलेले आहे. यामुळे 2019-20 च्या खरिप हंगामात 14 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना या योजने अंतर्गत 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण प्राप्त आहे.  2015-16 च्या खरिप हंगामापासून ही योजना शासनाने सुरु केली आहे.
 या योजनेअंतर्गत गेल्या 34 वर्षात 151 प्रस्ताव प्राप्त झाले  व हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.  58 मंजूर प्रस्तावापोटी शेतकऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्यात आली आहे.  विमा कंपनीने 33 प्रस्ताव नामंजूर केले तर 27 प्रस्ताव प्रलंबित आहे.  वारसांकडे प्रलंबित प्रस्तावांची संख्या 33 आहे.

   प्रधानमंत्री पीक विमा

 2018 च्या खरिप हंगामात 22,345 कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत संरक्षण देण्यात आले. यात धानासाठी सर्वाधिक विमा उतरविण्यात आला . धान 22101, सोयाबीन 208 व कपाशी 534 शेतकरी याप्रमाणे 75 कोटी 26 लक्ष 57 हजार  पीक विमा संरक्षण देण्यात आले.
 पीक विमा योजनेत गैरकर्जदार शेतकऱ्यांच्या पिकांनाही गेल्या खरिपात प्रथमच, संरक्षण देण्यात आले. यात 498 शेतकऱ्यांच्या पिकाचा 72 लक्ष 14 हजार रुपयांचा विमा उतरविण्यात आलेला आहे.

 बियाणांचे नियोजन

     2019-20 च्या खरिप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन आहे. यासाठी एकूण 26,740 क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी 15 हजार क्विंटल बियाणे महाबीजकडून प्राप्त होणार आहे. तर 11, 740 क्विंटल बियाणे खाजगी बियाणे वापरण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे.
 सोयाबीन 300 क्टिंवल, तूर 350 क्विंटल, बी. टी. कापूस 197 क्विंटल, मका 144 क्विंटल, उडीद 3 क्विंटल, तीळ एक क्विंटल या प्रमाणे एकूण 27,732 क्विंटल बियाणे या हंगामात लागणार आहे.

 खतांची मागणी

 खरिप हंगामासाठी जिल्हयात 52,137 मेट्रीक टन खताची आवश्यकता आहे. यात सर्वाधिक आवश्यकता युरियाची राहणार आहे. 28025 मे. टन इतकी आवश्यकता असेल. जिल्हयात खतांची 562 दुकाने आहेत.  किटक नाशकांची 249 तर बियाणांची 336 दुकाने आहेत. खते बियाणे यांचा काळाबाजार  होवू नये यासाठी पास मशीन आणि आधार क्रमांक याची मदत घेतली जाणार आहे.  याखेरीज 13 भरारी पथकेही निर्माण करण्यात आली आहेत.

 कृषी यांत्रिकीकरण

     कृषी विभागाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 565 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालीत यंत्राचा लाभ पुरविण्यात आले आहेत. यावर 6 कोटी 30 लक्ष 89 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.   कृषी यांत्रिकीरण अंतर्गत रोटाव्हेटर, दालमिल आदींची मदत देण्यात येत असते. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान देखील समाविष्ट आहे.

परसबाग

आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची योजना कृषी विभाग राबवित आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये असणाऱ्या 60 गावांमधील 418 आदिवासी कुटुंबियांना याचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी एक लाखांचा खर्च आला.
 आत्मातर्फे प्रयोग म्हणून करण्यात आलेली धानाची मल्चींग पध्दती तसेच धान व मत्स्यशेतीचा प्रयोग जिल्ह्यात सर्वत्र वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री राजे आत्राम  यांनी   दिल्या.
 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  अनंत पोटे  यांनी बैठकीत सादरीकरण केले.  आत्मातर्फे डॉ. प्रकाश पवार यांनी  'आत्मा' तर्फे करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची माहिती याप्रसंगी सादर केली.
   मागील वर्षी पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात 10 टक्के वाढ झाली ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे , केलेल्या आधुनिक शेतीमुळेच हे घडलेले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत पोटे यांनी केले तर आभार प्रिती हिरळकर यांनी मानले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-31


Related Photos