मनी लाँडरिंग प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम 'बेपत्ता'


वृत्तसंस्था / नवी दिल्लीः 'आयएनएक्स मीडिया'शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर 'बेपत्ता' झाले असून, त्यांचा मोबाइलही स्वीच ऑफ आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचे ('ईडी') पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावलीच; पण तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही चिदंबरम यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. 
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी २५ जानेवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी त्यांनी ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचा निकाल सुनावला. त्यामुळे जबर धक्का बसलेले चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद या ज्येष्ठ विधिज्ञ काँग्रेस नेत्यांशीही चिदंबरम यांनी चर्चा केली. पण, तोपर्यंत न्यायालयाचे कामकाज संपलेले होते आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कपिल सिब्बल यांना चिदंबरम यांची जामीन याचिका बुधवारी ज्येष्ठ न्यायाधीशांपुढे दाखल करण्याचे निर्देश दिले. चिदंबरम यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी घेतला जाईल. 
योगायोगाने न्या. सुनील गौर दोन दिवसांनंतर निवृत्त होत आहेत. चार वर्षांपूर्वी न्या. गौर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी याचिका फेटाळल्या होत्या, तर गेल्या वर्षी न्या. गौर यांनी नॅशनल हेरॉल्डची इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. 
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहण्यासाठी चिदंबरम आले होते. न्यायालयीन घडामोडींनंतर चिदंबरम यांना अटक करण्यासाठी सीबीआय अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण, त्यांचा मोबाइल फोन बंद असून, ते 'नॉट रिचेबल' झाले आहेत.    Print


News - World | Posted : 2019-08-21


Related Photos