महत्वाच्या बातम्या

 शिफ्ट संपली : अंघोळीसाठी तलावात गेलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू


- नगरधन येथील राइस मिलजवळील घटना; बिहारमधील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राइस मिलमधील सकाळची शिफ्ट संपल्यानंतर अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी सुमारे १.३० ते २ वाजताच्या सुमारास रामटेक-मौदा मार्गावरील नगरधन येथे घडली. या दुर्घटनेत बिहारमधील तीन तरुण कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राइस मिलमधील कामगारांमध्येही शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये गुलशन कुमार २० वर्षे रा. पुर्निया, बिहार, रूपेश कुमार १८ वर्षे रा. खगरिया, बिहार आणि मनीष कुमार १८ वर्षे रा. पुर्निया, बिहार यांचा समावेश आहे. नगरधन येथील मोहनलाल शंकरलाल अग्रो फूड्स प्रा. लि. या राइस मिलच्या मागील बाजूस असलेल्या तलावात ही दुर्घटना घडली. सकाळची शिफ्ट संपल्यानंतर तिघेही अंघोळीसाठी तलावाकडे गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर ते बुडाल्याची माहिती समोर आली.

२० ते २२ दिवसांपासून हमाल म्हणून काम -
रामटेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही नगरधन येथील ओंकार राइस मिलमध्ये हमाल म्हणून काम करीत होते. ते कंत्राटदार प्रशांत कुमार (बिहार) यांच्या माध्यमातून येथे कामावर आले होते. मागील सुमारे २० ते २२ दिवसांपासून तिघेही राइस मिलमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे. कंत्राटदार प्रशांत कुमार यांच्या माध्यमातून या राइस मिलमध्ये सुमारे ५० ते ६० हमाल काम करीत असल्याचे सांगण्यात आले. रोजगारासाठी बिहारमधून नगरधन येथे आलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळची शिफ्ट संपल्यानंतर तलावात उतरले -
शनिवारी सकाळची कामाची शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर गुलशन, रूपेश आणि मनीष हे तिघे अंघोळ करण्यासाठी ओंकार राइस मिलच्या बाजूला असलेल्या तलावाकडे गेले. अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर तिघेही बुडाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आवश्यक बचावकार्य आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. तिघांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांसह संबंधितांना देण्यात आली.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर -
रोजगाराच्या शोधात बिहारमधून महाराष्ट्रात आलेल्या तीन तरुणांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही दिवसांपासून नगरधन येथे काम करणाऱ्या या तरुणांचा झालेला मृत्यू त्यांच्या सहकाऱ्यांसाठीही धक्कादायक ठरला आहे. या घटनेचा पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत. तलावात नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही दुर्घटना घडली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos