कोब्राच्या चौकशीत अंतरजिल्हा चोरीचे धागेदोरे : बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील रेल्वे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोदामातून लोखंडी अँगल, प्लेट, जॅक आदी साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करीत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम याच्या चौकशीत चोरीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
विसापूर येथील रेल्वे गोदामातून लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान दोन विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. आरोपींची नावे रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम २५वर्ष रा. विसापूर आणि रोहन राजू सिडाम १९ वर्ष रा. विसापूर अशी आहेत.
पोलिसांनी रुषेश उर्फ कोब्रा आत्राम याची कसून चौकशी केली असता, त्याने बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ८५७/२०२६ मधील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान त्याने वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतही चोरीचे गुन्हे केल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आरोपींच्या माध्यमातून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांनी तपासाची दिशा त्या अनुषंगाने वाढविली आहे.
या कारवाईत आरोपींकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेल्वे साहित्य चोरीच्या तपासातून घरफोडीचा गुन्हा आणि इतर जिल्ह्यांतील चोरीचे धागेदोरे समोर आल्याने पोलिस तपासाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार विकास जुमनाके, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, पंकज शिंदे, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, शरदचंद्र कारुस, महेश कुकुडकर, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी आणि संदीप थेरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत असून, आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




