महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी काळानुरूप अद्ययावत राहावे : सी.ए. हर्ष टिंबडिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवण्यासोबतच उपलब्ध आधुनिक साधने व सुविधांचा योग्य वापर करून ज्ञानाचा विस्तार करावा, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटंट हर्ष प्रशांत टिंबडिया यांनी केले.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सी.ए. हर्ष टिंबडिया प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. रोशन फुलकर होते.

मार्गदर्शन करताना हर्ष टिंबडिया यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.), कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. इंटरनेट व आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींवर स्वतः उपाय शोधता येऊ शकतात. त्यामुळे समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.

स्टॉक मार्केट, क्रिप्टोकरन्सी आणि फायनान्स यांसह आर्थिक क्षेत्रातील विविध विषयांवरही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारत आर्थिक क्षेत्रात सध्या पाचव्या क्रमांकावर असून देशाला आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम करण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. देशात प्रशिक्षित चार्टर्ड अकाउंटंट्सची मोठ्या प्रमाणात गरज असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील संधींचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. रोशन फुलकर यांनी वाणिज्य शाखेचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींना घाबरून न जाता योग्य नियोजन आणि प्रयत्नांच्या माध्यमातून त्यावर मात करावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. कृष्णा लाभे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विनय कवाडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. मोहितकर, प्रा. साखरकर, प्रा. सोनोने यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos