महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी खताचा वापर करावा : कृषि विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरुप खते आहे, जी पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारी नत्र व स्फुरद ही मुख्य अन्नदव्ये पिकांना पुरवितात त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी खताचा वापर करावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

नॅनो युरिया हे एक द्रवरुप नत्रयुक्त खत असुन यामध्ये ४ टक्के नत्र कणांच्या स्वरुपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा ३० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरिया मध्ये नत्राचे प्रमाण कण हे अतिसुक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात. तसेच त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरियापेक्षा १० हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत असते. जी पारंपारिक युरिया मध्ये ३० ते ५० टक्के इतकी असते. ईफको नॅनो युरिया मधील नत्र हे उपलब्ध स्वरुपातील असल्यामुळे ते पिकांची नत्राची गरज प्रभावीपणे भागवते.

नॅनो डीएपीमध्ये कणांचा आकार १०० नॅनोमीटर पेक्षा कमी आहे. या अद्वितीय गुणधर्मामुळे बियाण्याणे मुळांच्या आत किंवा पानांवर उपलब्ध छिद्रातून आणि वनस्पतीच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करु शकतात. नॅनो डीएपी द्रवरुप पानांवर व बियाणांवर मुळांवर व्यवस्थीतपणे पसरतो आणि झाडांद्वारे सहजपणे उपयोगात आणला जातो. परिणामी स्वरुप बियाणांची जोम शक्ती वाढते. हरितद्रव्य जास्त बनते. प्रकाश विश्लेषण अधिक होते. पिकाची गुणवत्ता व पीक उत्पादनात वाढ होते.

जिल्ह्यात मागील वर्षी ५०० ग्रॅम मीलीच्या नॅनो युरियाच्या ८७ हजार २१६ बॉटलची विक्री झालेली  होती. शेतकऱ्यांना नॅनो युरिया फवारणीचे चांगले परिणाम दिसून आले होते. यावर्षी सुध्दा ३८ हजार १५० बॉटल डीएपी व २३ हजार ८५० बॉटल नॅनो युरिया विक्रीकरीता बाजारात उपलब्ध आहे. त्यापैकी २२ हजार २५० बॉटल डीएपीची विक्री झालेली आहे.

नॅनो खताचा वापर करसा करावा : सुक्ष्म कणांसाठी व पाने पूर्ण ओली होण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेली फवारणी पंपाचा वापर करावा. फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. जेव्हा पानांवर ओस नसेल अशावेळी फवारणी करावी. नॅनो खताची बाटली वापरण्यापुर्वी चांगली हलवावी. नॅनो डीएपी द्रव सगळ्या जैव उत्तेजक, इतर नॅनो खते जसे की, नॅनो युरिया, १०० टक्के विरघणारे खत आणि इतर शेतकी रसायनांमध्ये सहज मिसळता येते. परंतु फवारणीपुर्वी जार चाचणी करुन घ्यावी. स्फुरद युक्त खतांचा व युरियाचा टॉप ड्रेस डोस नॅनो डीएपी व नॅनो युरियाच्या वापराने ५० टक्के पर्यंत कमी केला जाऊ शकतो. जास्त कालावधीच्या पिकांमध्ये चांगला परिणाम मिळण्यासाठी नॅनो डीएपी व नॅनो युरियाची तिसरी फवारणी करावी.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी चे फायदे : नॅनो युरियाची ५०० मीली एक बाटली आणि युरियाची ४५ किलोची बॅग यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते. पारंपारिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो. नॅनो डीपीची ५०० मीलीची  एक बाटली आणि एका ५० किलो डीएपीची गोणी यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपरिक डीएपी खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते.

पिकांवर फवारणी केव्हा करावी : सोयाबीन पिकांवर फुले सुरु होण्याची अवस्था असतांना उगवणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी एकरी ५०० मीली व शेंगा लागण्याची अवस्था असतांना उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी नॅनो युरियाची दुसरी फवारणी करावी. कापूस पिकांवर पात्या लागण्याची अवस्था असतांना उगवणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी एकरी ५०० मीली नॅनो डीएपी व नॅनो युरिया मिसळून पहिली फवारणी व फुलोरा अवथा असतांना उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी नॅनो युरियाची दुसरी फवारणी करावी. तुर पिकांवर फाद्या फुटण्याची अवस्था असतांना उगवणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी एकरी ५०० मीली नॅनो डीएपीची पहिली फवारणी व फुलोरापुर्व अवस्था असतांना उगवणीनंतर ५० ते ६० दिवसांनी नॅनो युरियाची दुसरी फवारणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos