बिबट्याने केले दोन बकरे फस्त : नवीन ठाणेगाव परिसरात पुन्हा दहशत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी तालुक्यातील नवीन ठाणेगाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे. गुरुवारी एकाच रात्री बिबट्याने दोन बकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली. या घटनेत पशुपालक शेतकरी योगेंद्र अण्णाजी चापडे यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एकाच रात्री दोन बकऱ्यांची शिकार झाल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास बिबट्याने योगेंद्र चापडे यांच्या घराजवळ असलेल्या एका बकऱ्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने बकरीला ठार केल्यानंतर काही वेळातच परिसरातून धूम ठोकली. या घटनेमुळे चापडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.
दरम्यान, रात्रीचा हा हल्ला संपला असे वाटत असतानाच पहाटे सुमारे ४ वाजता बिबट्याने पुन्हा त्याच परिसरात हल्ला केला. यावेळी त्याने चापडे यांच्या दुसऱ्या बकऱ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात दुसरी बकरीही ठार झाली. एकाच रात्री बिबट्याने दोनदा हल्ला करून दोन बकऱ्यांचा फडशा पाडल्याने बिबट्याचा परिसरात मुक्त वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन ठाणेगाव परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वीही नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये आधीपासूनच दहशतीचे वातावरण आहे. आता घराजवळील पशुधनावरच हल्ला झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी शेतातील कामे तसेच पशुधनाची देखभाल करण्यासाठी बाहेर पडताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. परिसरात बिबट्याचा शोध घेऊन त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नवीन ठाणेगाव परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. वनविभागाने घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी आणि पशुपालकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




