बालसुधार गृहातून सहा अल्पवयीन मुलींचे पलायन : रामनगर पोलिसांनी हिंगणघाटातून घेतले सुरक्षित ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील बालसुधार गृहातून सहा अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची गंभीर घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे बालसुधारगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच रामनगर पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सहाही मुलींचा शोध घेतला. ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, सायबर तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलींचा माग काढत त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास बालसुधारगृहात समुपदेशनासाठी दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीने काचेचा ग्लास फोडून त्याचा तुकडा हातात घेतला. सुरक्षा रक्षक जवळ आल्यास त्यांना मारण्याची धमकी देत तिने अन्य पाच मुलींसह बालसुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. १२८४/२०२६, कलम १३७ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सहाही मुलींचा तातडीने शोध घेण्यासाठी सहा स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली.
पोलिसांनी चंद्रपूर शहरातील विविध मार्गांवरील ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून मुलींच्या हालचालींचा मागोवा घेतला. रेल्वेस्थानक, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे तसेच निर्जनस्थळे, मंदिरे आणि नदीकाठच्या परिसरातही शोधमोहीम राबविण्यात आली. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती संकलित करण्यासोबतच सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची तांत्रिक पुराव्यांशी पडताळणी करून शोधकार्याला दिशा देण्यात आली.
२० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास सहाही मुली हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नाईक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांना आवश्यक सूचना देत शोधकार्यात समन्वय साधला. रामनगर पोलिसांची दोन पथके तातडीने हिंगणघाटकडे रवाना झाली.
हिंगणघाट पोलिसांच्या मदतीने तसेच महिला पोलीस अंमलदारांच्या सहकार्याने हिंगणघाट रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर सहाही मुली आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी चंद्रपूर येथे आणण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभवती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, शरद भस्मे, रमेश नन्नावरे, अश्विनी वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक कैलास खोब्रागडे, कृष्णा दराडे, सौरभ साळुखे, पोलीस अंमलदार नितीन पेढाळकर, ललित जांभुळकर, आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार डेंगळे, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, राजू चिताडे, सूरज शेडमाके, ब्ल्यूटी साखरे आणि सायबर विभागाचे उमेश रोडे यांनी सहभाग घेतला.
तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नगराळे, पोलीस अंमलदार राजेश शेंडे, अंगेश्वर चौधरी, निलेश नुगुरवार, अमोल विगते आणि महिला पोलीस अंमलदार शामली बनसोड व अपर्णा डांगरे यांनी शोधकार्यात मोलाचे सहकार्य केले.




Petrol Price




