ताडोबात वाघाच्या अवघ्या १० फुटांवर दुचाकीस्वाराचा जीवघेणा निष्काळजीपणा : थरारक घटनेने वनविभाग सतर्क, चौकशीचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रात वन्यजीव सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघापासून अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर एका दुचाकीस्वाराने आपली गाडी थांबवून वाघाचे निरीक्षण केले. वाघासारख्या हिंस्र वन्यप्राण्याच्या इतक्या जवळ जाण्याचा हा निष्काळजीपणा दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वनविभागाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी दुपारी घडलेला हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहर्ली बफर मार्गावरील रस्त्याच्या कडेला गवतामध्ये एक प्रौढ वाघ विश्रांती घेत होता. विशेष म्हणजे, त्याच ठिकाणी वनविभागाने लावलेल्या फलकावर या मार्गावर वाहन थांबविल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून एका दुचाकीस्वाराने वाघाच्या अगदी जवळ आपली गाडी थांबवली.
वाघापासून अवघ्या दहा फुटांवर उभा असलेला हेल्मेटधारी दुचाकीस्वार वाघाकडे एकटक पाहत होता. त्याचवेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या बसमधील प्रवाशांनी त्याला वारंवार तेथून निघून जाण्याचा इशारा दिला. मात्र, दुचाकीस्वाराने त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. काही क्षणांतच वाघ उठून उभा राहिला आणि रस्त्याच्या कडेने चालू लागला. त्यामुळे परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर वाघ उंच गवतात निघून गेल्यानंतर परिस्थिती निवळली.
ताडोबाच्या जंगलातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर वाघ दिसताच वाहनचालक वाहने थांबवून गर्दी करतात. अनेकदा वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमंतीत अडथळा निर्माण होतोच, शिवाय पर्यटक आणि वाहनचालकांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. या घटनेची मोहर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष ठिपे यांनी पुष्टी केली असून, संबंधित दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. वन्यजीव सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. वन्यजीवांचे दर्शन घेण्याच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे ताडोबातील वनसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




