भंडारा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन : वाचन संस्कृतीला मिळणार चालना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासह ग्रंथ आणि वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने डिसेंबर महिन्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आज बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते, या बैठकीला नागपूर येथील जिल्हा ग्रंथालयाचे सहाय्यक संचालक रत्नाकर नलावडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, शिक्षक उपनिरीक्षक रवींद्र मामेडवार माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांची उपस्थिती होती.
ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध ग्रंथांची माहिती मिळावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक शाळा, ग्रंथांविषयी आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रंथपाल मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यंदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतजन्मोत्सव वर्षाचे औचित्य साधून ग्रंथोत्सवात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ग्रंथदिंडीसह महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती मिळणार आहे.




Petrol Price




