शाळा परिसर तंबाखूमुक्त करा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश


- १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी नियमित तपासणीचे आदेश; लसीकरणाला गती देण्याच्या सूचनाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर तातडीने तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आरोग्य विभागाला दिले. शाळांच्या परिसरापासून १०० मीटर अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य, लसीकरण आणि अन्य आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
१०० मीटर परिसरात नियमित तपासणी -
शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी नियमित तपासणी मोहीम राबवावी, असे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळा परिसर सुरक्षित आणि तंबाखूमुक्त ठेवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच शाळा परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती करण्यावरही भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख आरोग्याबाबत जनजागृतीवर भर -
राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तंबाखू आणि अन्य व्यसनांमुळे होणाऱ्या मुखाच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
मुख कर्करोगाची संभाव्य पूर्वलक्षणे वेळीच ओळखता यावीत, यासाठी तपासणी मोहिमा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी मुखाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये -
बैठकीत जिल्ह्यातील नियमित लसीकरण कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. बालके तसेच गरोदर महिलांना निर्धारित वेळेत लसीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या.
लसीकरणाच्या नोंदींची तपासणी करून ज्या बालकांचे लसीकरण प्रलंबित आहे, त्यांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्ह्यात एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी आरोग्य यंत्रणेला केले.
आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर -
तंबाखूमुक्त शाळा परिसर, मौखिक आरोग्य जनजागृती आणि सार्वत्रिक लसीकरण या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. आरोग्यविषयक योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचे निर्देशही देण्यात आले.




Petrol Price




