कोंढाळी-काटोल मार्गावर भीषण अपघात : देवीदर्शनावरून परतणाऱ्या तीन तरुणांचा मृत्यू

- भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; अपघातानंतर पसार झालेल्या चालकाला अटक
- लोकेशचा तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; रोशनच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : देवीदर्शन करून दुचाकीने घरी परतणाऱ्या तीन तरुणांचा प्रवास नियतीने अर्ध्यावरच संपविला. कोंढाळी-काटोल मार्गावरील कलकुही शिवारात शनिवारी १७ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भरधाव क्रुझर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पसार झालेल्या क्रुझरचालकाला कोंढाळी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपांशु दामोदर चाफले २५ वर्षे रोशन मारोती चाफले २५ वर्षे आणि लोकेश जगदीश बारंगे २५ वर्षे अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील रहिवासी होते. रोजगारानिमित्त ते कोंढाळी येथील विकासनगर परिसरात भाड्याने राहत होते आणि एका खासगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते.
देवीदर्शनावरून परतताना काळाचा घाला -
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी तिन्ही मित्र एकाच दुचाकीवरून काटोल परिसरात देवीदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते कोंढाळीकडे परतत होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कोंढाळीपासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावरील कलकुही शिवारात त्यांच्या दुचाकीला भरधाव क्रुझर वाहनाने जोरदार धडक दिली.
एमएच २७ बीई ४३८९ क्रमांकाचे क्रुझर वाहन कोंढाळीकडून मोहगाव (ढोले) येथील भाविकांना घेऊन काटोल-पारडसिंगा येथे देवीदर्शनासाठी जात होते. वाहनाचा वेग अधिक असल्याने क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे तिन्ही तरुण दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, तिघांनाही जीव वाचविण्याची संधी मिळाली नाही.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार -
अपघात घडल्यानंतर क्रुझरचालकाने थांबून जखमींना मदत करण्याऐवजी वाहनासह काटोलच्या दिशेने पलायन केले. त्याचवेळी कामावरून दुचाकीने कोंढाळीकडे येणारे जुबेर शेख आणि सागर भारसाकळे यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड आणि कोंढाळी पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोंढाळीचे ठाणेदार सुमित परतेकी आणि संजय गायकवाड रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लोकेशचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह -
या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचे आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांवर होते. लोकेश बारंगे याचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असताना काळाने त्याच्यावर झडप घातल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोशन चाफले हा विवाहित होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या रोशनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. तर दीपांशु चाफले हा अविवाहित होता. तिन्ही मित्रांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या नातेवाइकांसह परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
दोन तरुणांवर कोंढाळीनजीक, तर एकावर मूळ गावी अंत्यसंस्कार -
रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रोशन चाफले आणि दीपांशु चाफले यांच्यावर कोंढाळीनजीकच्या दुधाळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकेश बारंगे याच्यावर त्याच्या मूळ गावी कारंजा तालुक्यातील माणिकवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अल्पवयातच तीन मित्रांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कोंढाळी आणि त्यांच्या मूळ गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
क्रुझरचालकाला अटक; पोलिसांकडून पुढील तपास -
या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून क्रुझरचालक हेमराज गणपत उईके २७ वर्षे रा. शिवा सावंगा याला अटक केली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत. देवीदर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा घरी परतताना झालेला हा दुर्दैवी अंत अनेकांना चटका लावणारा ठरला आहे. एका क्षणात तीन कुटुंबांचा आधार हिरावला गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत असून, रस्ते अपघातांमधील निष्काळजीपणा आणि अपघातानंतर जखमींना मदत करण्याच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.त आले.




Petrol Price




