महत्वाच्या बातम्या

 गावातील स्मशानभूमी नसेल तर सरपंच व ग्रामसेवक जबाबदार : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- तातडीने तहसील प्रशासनाशी संपर्क साधा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये दफनभूमी स्मशानभूमी नसेल तर त्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकाची आहे. अशा सर्व गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी प्रलंबित प्रस्ताव सप्टेंबर महिन्यापर्यंत मार्गी लावावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिले.

प्रशासन प्रत्येक गावांमधील अंत्यसंस्कारासंदर्भातील दफनभूमी, स्मशानभूमी या संदर्भातील अडचण दूर करण्यासाठी तयार आहे. अगदी बोटावर मोजण्यासारख्या गावांमध्ये ही अडचण राहिली आहे. हा गुंता केवळ स्थानिक स्तरावरच्या पाठपुराव्या अभावी राहिलेला आहे. त्यामुळे संबंधित गावाच्या सरपंचाने तसेच ग्रामसेवकाने यासंदर्भात पाठपुरावा तहसील कार्यालयात किंवा गटविकास अधिकाऱ्यांकडे करावा, तहसील कार्यालयात सहकार्य मिळत नसेल तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. सप्टेंबर महिन्याच्या आत कोणत्याही गावांमध्ये ही समस्या राहता कामा नये, असे आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

गावात झुडपी जंगल असेल तर काय, वन क्षेत्रात जमीन असेल तर काय करायचे, जागा नसेल तर काय करायचे, खाजगी जागेत कशा पद्धतीने स्मशानभूमी निर्माण करायची या संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शन तहसील कार्यालय स्तरावर, तसेच गटविकास अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये विलंब करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos