ढोंगी बाबाने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार : गोंदिया जिल्ह्यातील घटना


-  उपचाराच्या नावावर ठेवले होते डांबून 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. या ढोंगी बाबाने उपचाराच्या नावावर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सात दिवस बंद घरात डांबून ठेवत तिच्यावर सतत पाच दिवस अत्याचार केला. लंकेश उर्फ वामनराव मेश्राम (३० ) रा. फुलचूर असे या ढोंगीबाबाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
गोंदिया येथील एका कुटुंबातील महिला आरोग्याशी संबंधीत समस्येने त्रस्त होत्या. त्यातच त्यांच्या परिवारातील १७ वर्षीय  अल्पवयीन मुलीच्या छातीला गाठ आल्याने ती गाठ दुरूस्त करून देण्याचा दावा फुलचूर येथील लंकेश उर्फ वामनराव मेश्राम या ढोंगी बाबाने केला. त्यामुळे लंकेश याला २७ मार्च रोजी उपचारासाठी घरी बोलाविण्यात आले. त्याने उपचाराच्या नावावर घरातील सर्व मंडळींना काळ्या रंगाची एक गोळी खायला दिली. त्या गोळीमुळे सर्वांना गुंगी यायची. त्या सर्व गुंगीत असताना आरोपी लंकेश हा १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करायचा. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उपचाराच्या नावावर त्याने त्या पीडित मुलीलाच नव्हे, तर घरात उपस्थित सर्व मंडळींना काळ्या रंगाची गुंगी आणणारी औषधी दिली. त्यानंतर गुंगीत असलेल्या त्या पीडितेच्या नातेवाईकांसमोरच त्याने सतत पाच दिवस त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 
दरम्यान, तिची मावशीही त्या पीडितेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिले होते. त्यामुळे तिची मावशीसुद्धा त्याच खोलीत बसून होती. तिच्या डोळ्यासमोर पीडितेवर अत्याचार केला. परंतु, कुणीच त्याचा विरोध करू शकले नाही. त्या घरात सात दिवस सात सदस्यांना ढोंगीबाबाने गुंगीचे औषध दिले. यात आठ वर्षीय दोन मुले तसेच पाच महिला व मुलींचाही समावेश होता. ३१ मार्च रोजी आरोपी लंकेश याने तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तो यशस्वी झाला नाही. दरम्यान, १ ते ४ एप्रिलदरम्यान दररोज चार दिवस त्याने तिच्यावर बळजबरी केली. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, ३७६ (२) (जे) (एन), ३४२, ५०६ सहकलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिल्यामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ९ एप्रिल रोजी त्याला पोलिस उपनिरीक्षक संदीया सोमनकर यांनी अटक केली. न्यायालयाने ९ ते १५ एप्रिल दरम्यान पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपीची रवानगी भंडारा येथील कारागृहात करण्यात आली आहे.   Print


News - Gondia | Posted : 2019-04-19


Related Photos