पोलिस विभागाच्या ‘ऑपरेशन हिंमत’ मुळे दुर्गम भागातील नागरीकांचा निवडणुकीत उत्स्फूर्त सहभाग


- नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता दुर्गम भागात मतदारांनी बजावला हक्क
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणूकीसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस विभागाने ‘ऑपरेशन  हिंमत’ राबवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. यामुळे दुर्गम भागातील नागरीकांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येने भाग घेतला. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी विक्रमी ७१.९८  टक्के मतदान झाले, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्हयात ‘सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९’ च्या यशस्वीतेसाठी  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे   यांच्या संकल्पनेतुन ‘ऑपरेशन   हिंमत’ राबविण्यात आले होते. या माध्यमातुन गडचिरोली जिल्हयातील नक्षलवादाबरोबरच दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मनात मतदानाविषयीची जागृती निर्माण होण्यासाठी तसेच मुक्तीपथाच्या सोबतीने जिल्ह्यातील दारूबंदी यशस्वी करून ‘दारूमुक्त निवडणुका’ पार पाडण्यासाठी व्युहरचना तयार करण्यात आली होती. ऑपरेशन  हिंमतच्या कृती आराखडयाची योग्य अंमलबजावणी करत गडचिरोली पोलीस दलाने यंदाच्या सार्वात्रिक लोकसभा निवडणुकीत नक्षली कृत्यावर अंकुश ठेवत निवडणुका यशस्वी करण्यासाठी राबविलेले ऑपरेशन   हिंमत फत्ते करण्यात यश मिळवले आहे. याचमुळे   २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत २.५ टक्क्यांची वाढ दिसुन येत आहे. ऑपरेशन  हिंमतच्या माध्यामातुन गडचिरोली पोलीस दलाने गडचिरोली जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ५९१ गावांना ग्रामभेटी देत मतदानाबद्दल व ६१ जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातुन आदिवासी बांधवांच्या मनामध्ये जगरूकता निर्माण केली. त्याचबरोबर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गडचिरोली शहरात नक्षलवाद विरोधात व मतदार जागृतीसाठी तब्बल १२ हजार महिलांच्या सहभागाने ७ ते ८ किमी पर्यंत साकारलेली ‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी चे यशस्वी आयोजन देखील गडचिरोली पोलीस दलाने करत मोठया प्रमाणावर महिलांमध्ये जागृती घडवून आणली. याचाच परिणाम म्हणून महिलांनी मोठया प्रमाणावर घराबाहेर पडुन आपला मतदानाचा हक्क बजावला. याचबरोबर मुक्तीपथच्या साथीने गडचिरोली पोलीस दलाने ‘दारूमुक्त निवडणुक’ यशस्वी करत निवडणुक कालावधीत जिल्हयाभरातील विविध पोस्टे, उपपोस्टे, पोमकें येथ मुंबई दारूबंदी कायदयान्वये १४१ गुन्हयांची नोंद करून १० हजार ३४० लिटर दारू व १ कोटी २४ लाख रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर ३४१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच ६३१ गुन्हेगारांच्या विरोधात   न्यायालयाने शिक्षा ठोठावली. निवडणूकीच्या कालावधीत नक्षल्यांनी केलेल्या  भुसुरूंग स्फोटात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ चे प्रत्येकी २ जवान जखमी झाले होते. यानंतर देखील तेथे तैनात असलेल्या जवानांनी शौर्यपुर्ण कामगिरी बजावत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत   पोलीस अधीक्षक यांनी या मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रोख स्वरूपात बक्षीस जाहीर केले आहे. आज   मौजा वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या दुर्गम भागात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असुन या मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळवुन लावत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे.   पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन  हिंमत’ च्या यशस्वीतेचे श्रेय   पोलीस अधीक्षक यांनी गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर सिआरपीएफ, एसआरपीएफ, होमगार्ड व इतर जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे व मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-15


Related Photos