२९० गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीचा ठराव


-  गावकरी सज्ज : अमुल्य मत दारूसाठी विकणार नसल्याचा निर्धार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
‘मुक्तिपथ’ च्या दारूमुक्त निवडणूक आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तब्बल २९० गावांनी ही लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा लेखी ठराव घेतला आहे. गावांमध्ये बंद असलेली दारू निवडणुकीच्या आदल्या रात्री वाटू देणार नाही. ‘आपले अमुल्य मत दारूच्या एका बाटलीला विकणार नाही’, असा निर्धार पुरुषांनी तर ‘माझ्या नवऱ्याला दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मत देणार नाही’, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
  दारू आणि तंबाखूविक्री बंद करण्यासाठी जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान सुरू आहे. मुक्तिपथ च्या पुढाकाराने ६०० च्या वर गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण निवडणूक काळात मतदारांना आमिष दाखवून मत मिळविण्याचा प्रयत्न उमेदवार आणि पक्षीय कार्यकर्ते करण्याची शक्यता असते. हा प्रकार घडू नये आणि दारूबंदी टिकून राहावी यासाठी सर्च चे संचालक आणि मुक्तिपथ चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी ही लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन जिल्ह्यासह देशातील जनतेला केले. यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. ‘ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक’, ‘दारू पिऊन मतदान करू नका’, ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, ‘दोन पैशाची दारू घेऊन आपले अमुल्य मत देऊ नका’ असा आशयाच्या संदेश फलकांद्वारे जिल्हाभर जनजागृती करण्यात आली. मुक्तिपथ गाव संघटन असलेल्या अनेक गावांमध्ये सभा घेऊन दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेण्यात आले. यामध्ये अहेरी तालुक्यातील २०, सिरोंचा ४२, वडसा २२, भामरागड ४८, आरमोरी १५, धानोरा १६, कुरखेडा १६, मुलचेरा २३, एटापल्ली १८, गडचिरोली २४, कोरची २० आणि चामोर्शी तालुक्यात २६ अशा एकूण २९० गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ठराव मंजूर करून या काळात गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर मुक्तिपथ तालुका चमुद्वारे शेकडो गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीवर गावसभाघेण्यात आल्या. दारू पिऊन मतदान केल्यास होत असलेले नुकसान त्यांना समजावून सांगण्यात आले. यामुळेही व्यापक जनजागृती झाली.

पक्षीय उमेदवारांनी केला दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प

अनेकदा उमेदवार आणि पक्षीय कार्यकर्त्यांद्वारेच निवडणूक काळात दारूचा वापर केला जातो. त्यामुळे गडचिरोली चिमूर मतदार संघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढणारे डॉ. नामदेव उसेंडी, भाजपचे उमेदवार खासदार   अशोक नेते, वंचित बहुजन आघाडीचे डॉ रमेश गजबे, आंबेडकरराईट पार्टीचे देवराव नन्नावरे आणि बसपाचे उमेदवार  हरिश्चंद्र मंगाम यांना  दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प जाहीर करण्याचे आवाहन डॉ. बंग यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या पाचही उमेदवारांनी ‘लोकसभेच्या निवडणुकीत मी व माझा पक्ष मतदानासाठी दारूचा वापर करणार करणार नाही’ असा लेखी संकल्प मुक्तिपथला लिहून दिला.


निवडणूक पथकातील कर्मचाऱ्यांच्या रक्ताची तपासणी

निवडणूक पथकातील कोणत्याही कर्मचाऱ्याने मद्यपान व इतरही व्यसन करू नये अशा सूचना गडचिरोली उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मापदंडाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी प्रारूप तत्वावर निवडणूक पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने तपासले जाणार असल्याचेही उपविभागीय दंडाधिकारी यांनी सांगितले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-09


Related Photos