महत्वाच्या बातम्या

 आरडीएसएस सह विविध योजनांची कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करा


- महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : संशोधित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतील विद्युत विकासाची कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिले.

चंद्रपूर येथे झालेल्या बैठकी मध्ये रेशमे यांनी आरडीएसएस योजनेतील वाहिनी विलगीकरण, कुसुम-ब योजना, रिॲक्टिव्ह   पॉवर कॉम्पेन्सेशन व प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसंदर्भात आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा, प्रभारी रवींद्र वांदीले), चंद्रपूर मंडलाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कंत्राटदार विश्वनाथ व श्रीम कॅपॅसिटरचे प्रतिनिधीही बैठकीस हजर होते. योजनांत माईलस्टोनप्रमाणे किती कामे झाली, त्यात येणारे अडथळे, त्यावरील उपाय यावर चर्चा झाली. कोणत्याही योजनेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना रेशमे यांनी कंत्राटदारांना दिल्या.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत चंद्रपूर परिमंडळातील ५ हजार ग्राहकांना रूफ टॉप सोलर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध योजनांच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, वन ‍विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध खात्यांशी समन्वय साधून ना-हरकत  तातडीने प्राप्त करावी. तसेच वा‍हिनी विलगीकरणासाठी मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजना- २.० मध्ये निवड झालेल्या उपकेंद्रांना प्राधान्य ‌द्यावे. तसेच जे शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित आहेत, अशा शेतकऱ्यांना कुसुम-ब योजनेतून सौर कृषिपंप घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही रेशमे यांनी केले.

महावितरणच्या आढावा बैठकीत बोलताना संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा/प्रभारी ) रवींद्र वांदीले आदींची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos