महत्वाच्या बातम्या

 ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्टेरिंग आता तिच्या हाती : महिलांना संधी देणारा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. अनेक पर्यटक याठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. मात्र आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक नवी सुरुवात करण्यात आली आहे.

येथे जिप्सी चालक म्हणून महिला चालकांची नेमणूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांना संधी देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.

सध्या सर्व जिप्सी ड्रायव्हर पुरुष आहेत तर २५ महिला गाईड म्हणून कर्तव्य बजावत आहेत. यातच आता महिलांना आणखी एक नवी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणामुळे या महिलांना व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून संधी मिळणार आहे. याशिवाय अनेक शासकीय विभागांमध्ये आणि खाजगी आस्थापनांमध्ये ड्रायव्हर म्हणून संधी उपलब्ध होणार आहे. जिप्सी ड्राईव्हरचे प्रशिक्षण देण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नऊ गावातील महिलांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्या अर्जांपैकी ८४ महिलांची निवड करून ३० महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू केले आहे.

दरम्यान, ताडोबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र येथील स्थानिक गाईडला इंग्रजी भाषा येत नसल्याने त्यांना पर्यटकांना ताडोबाची माहिती देता येत नाही. ही समस्या लक्षात घेता आता येथील गाईडसाठी ताडोबा प्रशासनाच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे क्लास सुरु करण्यात आले आहेत. यामुळे विदेशातील पर्यटकांना योग्य आणि अचूक माहिती देता येऊ शकणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos