महत्वाच्या बातम्या

 नवयुवकांनो मतदार होण्यासाठी मानकापूर स्टेडियमला या : निवडणूक विभागाचे १५ जुलैला युवा मिशन


- मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
- विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :  तुम्ही १८ वर्षांचे झाले असाल आणि मतदार यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर जिल्हा प्रशासनातर्फे नवतरुणांसाठी शनिवारी मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत येऊन कला, क्रीडा व माहितीपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच मतदार म्हणून नोंद करावी, लोकशाहीत मताधिकार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.विपीन इटनकर यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात युवा मिशन राबविण्यात येत आहे. युवा मिशनचा उद्घाटन सोहळा १५ जुलै रोजी मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात होणार असून उद्घाटक म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात होणार होता. मात्र, स्थळ बदलविण्यात आले असून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याठिकाणी साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले असून भारतीय लोकशाही व्यवस्थेतील निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाच्या टप्प्यांची माहिती देणारे तसेच मतदान नोंदणी करणारे स्टॅाल याठिकाणी लावले जाणार आहेत.
युवा मिशन ७५ अंतर्गत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ७५ टक्के झाली पाहिजे यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आता विविध उपक्रम जिल्हा प्रशासन राबवणार आहे.
या कार्यक्रमात सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील निवडणुकीची जबाबदारी असणा-या प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील नवतरुणांनी मतदार होण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांनी आपल्या अठरा वर्षावरील मुलामुलींना या मतदान नोंदणी प्रक्रियेत तसेच मानकापूर स्टेडियमवर आयोजित लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या मुला-मुलींना पाठवावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos