महत्वाच्या बातम्या

 कोटगुलमध्ये जनजागरण मेळावा व साहित्य वितरण


- प्रोजेक्ट उड्डाणअंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद , कबड्डी, व्हॉलीबॉल व रेला नृत्य स्पर्धेत शेकडो नागरिकांचा सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उड्डाण’अंतर्गत कोटगुल येथे विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी तसेच आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन ८ व ९ सप्टेंबर असे दोन दिवस करण्यात आले. या स्पर्धांचा समारोप जनजागरण मेळावा, बक्षीस वितरण आणि विविध साहित्याच्या वाटपाने करण्यात आला.

पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक प्रशासन गोकुळ राज, अपर पोलिस अधीक्षक अभियान कार्तिक मधीरा तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलिस स्टेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जंगल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोटगुलचे प्रभारी अधिकारी विवेक वायकर तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

दोन दिवसीय स्पर्धेत कोटगुल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावांमधून कबड्डीचे १४ संघ, व्हॉलीबॉलचे १२ संघ आणि पारंपरिक आदिवासी रेला नृत्याचे ३ संघ सहभागी झाले. क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमाला स्पर्धकांसह शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कबड्डीत जय शिवनाथ ओरिजन क्रीडा मंडळ अव्वल -
कबड्डी स्पर्धेत जय शिवनाथ ओरिजन क्रीडा मंडळ, कोटगुल या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ३ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. गोंडवाना कबड्डी संघ, देऊळभट्टी याने द्वितीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये, तर बिरसा मुंडा कबड्डी संघ, अमराईटोला याने तृतीय क्रमांक मिळवत १ हजार रुपये रोख पारितोषिक पटकावले.

व्हॉलीबॉलमध्येही चुरशीच्या लढती -
भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला. जय झरण व्हॉलीबॉल संघ, कोहकाबोडी याने द्वितीय क्रमांक मिळवत २ हजार रुपये, तर गोंडवाना व्हॉलीबॉल संघ, देऊळभट्टी याने तृतीय क्रमांक मिळवत १ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.

जनजागरण मेळाव्यात विविध साहित्याचे वितरण -
स्पर्धांच्या समारोपानंतर आयोजित जनजागरण मेळाव्यात नागरिक व उपस्थितांना पोलिस विभागाच्या विविध जनहितकारी उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी गरजू नागरिकांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये स्कूल बॅग, ब्लॅंकेट, साड्या आणि मच्छरदाण्या आदी साहित्याचा समावेश होता. या उपक्रमामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांशी पोलिस प्रशासनाचा थेट संवाद वाढण्यास मदत होत असून, युवकांना क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक दिशेने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य -
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोटगुलचे प्रभारी अधिकारी विवेक वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल कार्ले, जिल्हा पोलिस दलातील अंमलदार तसेच एसआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक फणसे, शेंडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक विशाल कार्ले यांनी नागरिक व खेळाडूंना मार्गदर्शन केले. युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत आयोजित या उपक्रमामुळे कोटगुल परिसरातील युवकांना आपले क्रीडागुण व सांस्कृतिक परंपरा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.





  Print






Related Photos