महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्व याचे औचित्य साधून राज्यात २६ जून ते २६ जुलै या कालावधीत पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत शाळा शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र देण्यासोबत इयता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी परीक्षेला बसलेल्या, पदविका तृतीय वर्ष अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र शाळेतच मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, गटशिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमीक), उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, शाळा मुख्याध्यापक यांच्या मार्फत आवश्यक नियोजन व सक्षम कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

कोणीही मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्रा पासून वंचित राहू नये हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये शाळा व महाविद्यालये यांच्या कडून समन्वय (नोडल) अधिकारी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्याथ्यांचे परिपूर्ण अर्ज घेऊन ते जिल्हा जात पडताळणी समिती तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

नुकतेच १२ वी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाकरिता एमएचटी सीईटी, नीट, जेईई आदी परीक्षा दिल्या आहेत. एमबीए, पी.एचडी, बीएस्सी ॲग्री, बीफार्म, बीएस्सी नर्सिंग आदी व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक विद्याथांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थाना संविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टीच्या https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून त्याची मूळ प्रतीसोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र, बोनाफाईड दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ जिल्हा जात पडताळणी समिती पुणे ३ येरवडा यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे.

जात वैधता प्रमाणपत्राकरिता अगोदर अर्ज सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांनी व ज्यांच्या प्रकरणात त्रुटी आहेत व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित आहे, अशा अर्जदारांना समितीने भ्रमणध्वनीद्वारे/ ई मेल द्वारे संदेश पाठविण्यात आले आहेत. अशा अर्जदारांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या कागदपत्रासह त्रुटीची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यलयात उपस्थित रहावे, असेही कळविण्यात आले आहे.

वेळेत अर्ज सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणारा नाही त्यामुळे तात्काळ अर्ज सादर करावेत. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहनही डॉ. देवरे यांनी केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos