महत्वाच्या बातम्या

 शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात शिक्षिकेला जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून तिच्यासह आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी आरोपी मिनालाल पिंपळकर व त्याची पत्नी संध्या पिंपळकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घरासमोरील टिनाचे छत तोडून दोन हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले.

भिवापूर येथील एका कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका कार्यरत असून, त्या आपल्या मुलीसह भिवापूर येथे राहतात. दर शनिवार व रविवारी त्या आई-वडिलांकडे जात असतात. त्यांच्या आई-वडिलांच्या घराजवळ राहणारा मिनालाल पिंपळकर हा दारूच्या नशेत वारंवार त्यांना व त्यांच्या आई-वडिलांना विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शिक्षिका आईसोबत शेतातून कापूस वेचून घरी परतल्या होत्या. त्यावेळी आरोपी मिनालाल पिंपळकर व शंकर धोटे हे दोघे दारूच्या नशेत वाहनाने तेथे आले. घरासमोरील रस्त्यावर वाहन उभे करून मिनालाल याने शंकर धोटे याच्याशी अश्लील शेरेबाजी केली. यावर शिक्षिकेने जाब विचारला असता मिनालाल आणि त्याची पत्नी संध्या यांनी शिक्षिका व त्यांच्या आई-वडिलांसोबत वाद घातला.

यावेळी मिनालाल याने हातात काठी घेऊन मारण्यासाठी अंगावर धाव घेतली. तसेच अनुसूचित जातीतील महिलांना उद्देशून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. शिक्षिकेच्या आई-वडिलांना मारण्याची भाषा करून जीवे मारण्याची धमकीही दिली. याशिवाय त्यांच्या वडिलांच्या घरासमोरील टिनाचे छत तोडून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी भिसी पोलिसांनी आरोपी मिनालाल पिंपळकर व संध्या पिंपळकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे करीत आहेत.





  Print






Related Photos