सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज ८ आणि उद्या ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपाला गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी संघटनांनी पाठींबा दिला असून आज ८ जानेवारी रोजी दुपारी २  ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले तसेच निदर्शने केली.
केंद्रीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, कंत्राटी, मानधनी कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, श्रमिक, कामगार देशव्यापी संपावर आहेत. या संपाला सर्वत्र पाठींबा मिळत आहे.
राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी सुध्दा संपात सहभागी झाले आहेत. नविन अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करा, सातवा वेतन आयोग मंजूरीचे आदेश तत्काळ निर्गमित करा, भाववाढ रोखण्यास उपाययोजना करा, बेरोजगारी कमी करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरा, कामगार कायद्यात कर्मचारी विरोधी बदल करण्यात येवू नये, आयकराच्या गणणेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी, आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.
गडचिरोली येथे आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.के. चडगुलवार , सरचिटणीस भास्कर मेश्राम, संजय मैंद, सहसचिव विनोद मैंद, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के, ग्रामसेवक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष प्रदिप भांडेकर, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कविश्वर बनपुरकर, मायाताई बाळराजे, छायाताई मानकर, मंगलाताई बिरनवार, शिल्पा मुरारकर, अर्चना श्रीगारेवार, डाॅ. विजय उईके, अशोक ठाकरे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-08


Related Photos