महत्वाच्या बातम्या

 पातागुडमनंतर कोपेल्यात दोन लाखांचे सागवान जप्त


- असरअल्ली वनपरिक्षेत्राची आठवडाभरात दुसरी मोठी कारवाई; १० नग सागवानी लाकूड जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : पोळा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सागवान लाकडाच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने गस्त आणि शोधमोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत असरअल्ली वनपरिक्षेत्राने अवघ्या आठवडाभरात दुसरी मोठी कारवाई करत कोपेला-१ नियतक्षेत्रातील जंगलातून तब्बल २ लाख १७ हजार रुपये किमतीचे १० नग सागवानी लाकूड जप्त केले. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

यापूर्वी पातागुडम परिसरातील इंद्रावती नदीकाठावर वनविभागाच्या पथकाने दोन सागवान लड्ढे जप्त केले होते. या कारवाईनंतर वनविभागाने परिसरातील जंगलांमध्ये गस्त वाढवून सागवान तस्करीच्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून कोपेला परिसरात ही कारवाई करण्यात आली.

असरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे यांनी सागवान तस्करीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना क्षेत्र सहाय्यक गेडाम यांना दिल्या होत्या. त्यानुसार वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने उपक्षेत्र कोपेला अंतर्गत नियतक्षेत्र कोपेला-१ मधील कक्ष क्रमांक २९८ येथे जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी संशयास्पदरीत्या लपवून ठेवलेले सागवानी लाकूड आढळून आले. पथकाने पंचनामा करून एकूण १० नग सागवानी लाकूड जप्त केले. जप्त लाकडाची बाजारमूल्य किंमत सुमारे २ लाख १७ हजार रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.

दरम्यान, जप्त सागवानाच्या प्रकरणी संबंधितांविरुद्ध वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या लाकडामागे कोणाचा हात आहे, तसेच ते कुठून आणण्यात आले आणि पुढे कुठे नेण्याचा प्रयत्न होता, याचा तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी वनकर्मचाऱ्यांकडून परिसरात अधिक तपास आणि गस्त सुरू आहे.

महिनाभरात सुमारे १० लाखांचे सागवान जप्त -
असरअल्ली वनपरिक्षेत्राने मागील महिनाभरात सागवान तस्करीविरोधात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये जवळपास ९ घनमीटर सागवानी लाकूड जप्त केले आहे. या जप्त सागवानाची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यातील जंगल परिसरात मौल्यवान सागवानाची अवैध तोड व वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाकडून गस्त, नाकाबंदी आणि संशयित ठिकाणी तपासणी वाढविण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात सागवान तस्करीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने विशेष दक्षता घेतली असून, पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





  Print






Related Photos