नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभाग आता लोकांशी 'कनेक्ट' होणार


वृत्तसंस्था / पुणे :  नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने आता लोकांशी 'कनेक्ट' होण्याचे ठरवले असून, येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाइलवर अलर्ट येणार आहेत.   विजांचा कडकडाट, वादळी पाऊस, अतिवृष्टीचा इशारा आता थेट नागरिकांच्या मोबाइलवर येणार आहे.   काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर टीव्ही आणि एफएम रेडिओवरही दर काही तासांनी अपडेट मिळणार आहेत. 
हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के. जे. रमेश यांनी पुणे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बुधवारी मान्सून अंदाजासंदर्भात बैठक घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून, नवीन उपक्रमांची माहिती दिली. हवामानशास्त्र विभाग आता लोकाभिमुख होत आहे, असे त्यांनी सांगितले. 
हवामानाचे अंदाज तातडीने सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. देशभरातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना, आपत्कालीन विभागांना आम्ही घटनेपूर्वी काही वेळ आधी सतर्कतेचा इशारा देत आहोत. गेल्या वर्षभरात उष्णतेच्या लाटेचे 'अपडेट' आम्ही सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्याने यंदा उष्माघात झालेल्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले आहे. थंडीच्या लाटेबद्दलही आम्ही सातत्याने जनजागृती केली होती. हवामानशास्त्र विभाग लोकाभिमुख झाल्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसत आहेत. यापुढेही यात अजून एक पाऊल पुढे टाकून 'कॉमन अलर्ट प्रोटोकॉल' देशभर राबविणार आहोत, असे रमेश म्हणाले. 
वादळी वाऱ्यासह पाऊस असो, की अतिवृष्टीचा इशारा... आतापर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला पुरेसा वेळ आधी देत होतो; पण त्यांच्याकडून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही कॉमन अलर्ट प्रोटोकॉल ही यंत्रणा विकसित केली आहे. काही राज्यात 'बीएसएनएल'बरोबर आम्ही सतर्कतेचे संदेश 'अलर्ट मेसेज'मधून लोकांना पाठवत आहोत. यामुळे आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळता आले आहे. आता इतर मोबाइल कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. प्रत्येक शहरात मोबाइल टॉवर आहेत. कंपनी कोणतीही असो, प्रत्येक टॉवरवरून त्या भागात पाच किलोमीटर अंतरात असलेल्या लोकांना थेट मेसेज कसे पाठवता येतील, यावर काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाच्या घटना वाढणार आहेत. यापूर्वीच सर्व राज्यात 'अलर्ट सिस्टीम' सुरू होईल; याशिवाय सर्व एफएम चॅनेल आणि टीव्ही चॅनेलवरूनही आम्ही संदेश देणार आहोत, असे रमेश यांनी सांगितले. 
गेल्या वर्षभरात उष्णतेच्या लाटेचे अपडेट आम्ही सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले. परिणामी, उष्माघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली. हवामानशास्त्र विभाग लोकाभिमुख झाल्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसत आहेत. यापुढेही विविध उपक्रमांतून आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा, लोकाभिमुख होण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.   Print


News - Rajy | Posted : 2019-03-07


Related Photos