महत्वाच्या बातम्या

 जन्म घेताच मृत्यूशी झुंज : नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू


- शिवणी येथील प्रीती काळबांधे यांच्या बाळाचा जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मृत्यू; गर्भातच विष्ठा झाल्याने प्रकृती झाली होती गंभीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जन्म घेताच मृत्यूशी सुरू झालेल्या एका चिमुकल्याची झुंज अखेर १५ सप्टेंबर रोजी दुपारी संपली. शिवणी येथील प्रीती काळबांधे यांच्या नवजात बाळाचा जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गर्भातील बाळाने पोटातच विष्ठा केल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन करण्याचा निर्णय घेत बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

शिवणी येथील प्रीती काळबांधे यांना प्रसूतीसाठी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर गर्भातील बाळाने पोटातच विष्ठा केल्याचे आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी प्रसूती लांबविण्याऐवजी तातडीने सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सोमवारी रात्री सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि बाळाचा जन्म झाला. मात्र, जन्मानंतर बाळाने सुरुवातीला तत्काळ रडण्यास सुरुवात केली नाही. काही वेळाने बाळ रडले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाळाला तातडीने नवजात अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

प्रकृती गंभीर; उपचारांना प्रतिसाद नाही -
नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गर्भातच विष्ठा झाल्यामुळे बाळाची स्थिती चिंताजनक बनली होती. बाळाला वाचविण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असतानाच १५ सप्टेंबर रोजी दुपारी बाळाचा मृत्यू झाला. जन्मानंतर काही तासांतच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने काळबांधे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, प्रसूतीनंतर आईची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पंधरा दिवसांत तीन माता-बाल मृत्यूच्या घटना -
गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत माता-बाल मृत्यूच्या घटना घडत असतानाच नवजात बाळाच्या मृत्यूची ही आणखी एक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत तीन माता-बाल मृत्यूच्या घटना घडल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नवजात बालकांना वेळेवर आणि अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधा, तज्ज्ञ मनुष्यबळ आणि नवजात अतिदक्षता सेवेची क्षमता याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र, शिवणी येथील या प्रकरणात गर्भातील बाळाने विष्ठा केल्याने प्रसूतीपूर्वीच परिस्थिती गंभीर झाल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन करून बाळावर उपचार सुरू केले होते. वैद्यकीय पथकाने प्रयत्न करूनही बाळाला वाचविता आले नाही.





  Print






Related Photos