चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू


- यूआयटी महाविद्यालयाजवळ भीषण अपघात; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आईवर दुःखाचा डोंगर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आरमोरी मार्गावर चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.१५ वाजताच्या सुमारास गोगावजवळील यूआयटी महाविद्यालय परिसरात घडली. भूषण कोमलदास शेंडे (वय २९, रा. गोगाव, ता. जि. गडचिरोली) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गोगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, भूषण शेंडे हा १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुचाकीने गडचिरोली येथून आरमोरी मार्गे आपल्या गोगाव या गावाकडे जात होता. दरम्यान, आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात भूषण याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी किशोर वासुदेव मांडवगडे (वय ३६, रा. गोगाव) यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चारचाकी वाहनचालक नितीन श्रीराम साबे (वय ४६, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील दुचाकी आणि चारचाकी वाहन पोलिसांनी नोंदवून घेतले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहेत.
वडिलांनंतर एकुलत्या एक मुलालाही गमावले; आईवर दुःखाचा डोंगर -
भूषण शेंडे हा अविवाहित असून, तो आपल्या आईसोबत गोगाव येथे राहत होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याचे वडील कोमलदास शेंडे यांनी आत्महत्या केली होती. पतीच्या निधनानंतर मुलाचाच आधार असलेल्या आईवर आता अपघाती मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधी पती आणि आता एकुलत्या एक मुलाला गमावल्याने या मातेच्या दुःखाला पारावार उरलेला नाही. या घटनेने गावकऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
आरमोरी मार्गावरील वाढती वर्दळ चिंतेचा विषय -
दरम्यान, आरमोरी मार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी या मार्गावर दुचाकींसह अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीतील निष्काळजीपणामुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनानेही या मार्गावरील वाहतूक सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




Petrol Price




