सिंदेवाहीत रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नवरगाव-सिंदेवाही मार्गावरील एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचा मागील डाला पलटी झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी ट्रकचालक अब्दुल आतीफ शेख रफीक ४८ वर्ष, रा. जुने शहर, अकोला याच्याविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पथक नवरगाव-सिंदेवाही मार्गावर गस्तीवर होते. दरम्यान, एमआयडीसी परिसरात सिंदेवाहीकडून नवरगावच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ९५९९ भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन त्याचा मागील डाला पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ट्रकच्या पलटी झालेल्या डल्यामध्ये रेती असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालक अब्दुल आतीफ शेख रफीक याच्याकडे रेती वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने परवाना असल्याचे सांगितले.
ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा प्रकार घडला. या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय जुमनाके करीत आहे.




Petrol Price




