पोर्ल्यात शेतकऱ्यावर वाघाची झडप : मुलीच्या आरडाओरडीने वाचला जीव


- कापूस पिकावर फवारणी करताना अचानक हल्ला; पोट व हाताला गंभीर दुखापत, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कापूस पिकावर औषध फवारणी करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोर्ला येथे घडली. वाघाने अचानक हल्ला केल्याने शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत त्याच्या मुलीने मोठ्याने आरडाओरड केल्याने वाघ बिथरला आणि मोठी दुर्घटना टळली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव भाऊराव म्हशाखेत्री (वय ५०, रा. पोर्ला) असे आहे.
विश्रांतीसाठी बसले अन् वाघाने घेतली झेप -
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊराव म्हशाखेत्री हे रविवारी सकाळी आपल्या शेतातील कापूस पिकावर औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत शेतात उपस्थित होती. फवारणीचे काम सुरू असताना काही वेळाने भाऊराव विश्रांती घेण्यासाठी शेतात बसले.
याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. काही कळण्याच्या आत वाघ जवळ आल्याने भाऊराव यांची घाबरगुंडी उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मुलीच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला -
वाघ समोर दिसताच भाऊराव यांची मुलगी क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने आरडाओरड करू लागली. तिच्या आवाजामुळे भाऊराव सावध झाले. त्याचवेळी झालेल्या आरडाओरडीने वाघही बिथरला.
परिणामी वाघाला भाऊराव यांच्यावर पूर्णपणे हल्ला करता आला नाही. वाघाच्या पंजाचा मार बसल्याने भाऊराव थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यात त्यांच्या पोटाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे भाऊराव यांचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले -
घटनेनंतर जखमी भाऊराव यांना तातडीने पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या भाऊराव म्हशाखेत्री यांची प्रकृती स्थिर असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वन विभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा -
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून मौका पंचनामा केला. परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी जखमी शेतकऱ्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण -
पोर्ला परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध कामांसाठी दररोज शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतातच वाघाने हल्ला केल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांना सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
शेतात काम करताना वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत सतर्क राहणे आणि शक्यतो एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.




Petrol Price




