महत्वाच्या बातम्या

 वेकोलि बाधित गावांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलि बाधित गावांमधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासह स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत मिळवून देण्याच्या प्रश्नांवर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर हंसराज अहीर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी त्यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत वेकोलि बाधित गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वेकोलिच्या सीएसआर निधीतून आरओ वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जवळपास संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेकोलि बाधित गावांतील गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करून मदत करण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून वेकोलि प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय वेकोलिच्या ओव्हरबर्डन (ओबी) कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. स्थानिक भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना त्या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले. संबंधित कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यासाठी वेकोलि प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वेकोलि बाधित गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी घुग्गुसचे नगरसेवक गणेश पिंपळकर, मयूर भोकरे, विशाल डामेर, रमण तांड्रा, शाम खेवले, गणेश मुसळे, सिन्हा महाकाले, धनंजय सिंग, शैलेश दिंडेवार आणि चेतन शर्मा उपस्थित होते.

वेकोलि बाधित गावांतील नागरिकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणे आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका रघुवीर हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.





  Print






Related Photos