महत्वाच्या बातम्या

 भंडारा : गेल्या वर्षात विजेने घेतले १४ बळी, पावसाळ्यात विजेपासून सावध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : विद्युल्लता, सौदामीनी, विजेला कितीही नावे असली तरी पावसाळ्यातील विजेने आता काळजी वाढवली आहे. तरी देखील या पावसाळयात विजेपासून संरक्षणाची नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे. विजेपासून संरक्षणासाठी आपत्ती विभागाने सूचना दिल्या आहेत.

शेतात, मोकळे मैदान, झाडे किंवा उंच स्तंभाजवळ जाऊ नका. कारण त्यांच्याकडे विजेच्या झटक्याची सर्वाधिक शक्यता आहे. विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा इ. सुरक्षित आसरा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेने टाळावे कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या. कार्यालये, दुकाने यांची दारे-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा. धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा. धरणे, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा. टेलिफोन किंवा वीजेच्या खांबाखाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा.

जर आपण घराच्या आत असाल आणि बाहेर वीजा होत असतील तर आपण घरात विद्युत उपकरणांपासून दूर रहावे. विजेच्या वेळी टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट यासारख्या सेवा वापरणे टाळा. खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद करा. अशी कोणतीही वस्तू आपल्या जवळ ठेवू नका जी विजेचा चांगला कंडक्टर आहे. कारण विजेचे चांगला कंडक्टर आकाशीय विजेला आपल्याकडे आकर्षित करतो. वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ- आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो. खुल्या गच्चीवर जाण्यापासून टाळा. मेटल पाईप्स, नळ, कारंजे इत्यादीपासून दूर रहा. जर आपण वाहन चालवत असाल आणि कारची छप्पर मजबूत असेल तर बाहेर निघू नका. लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करा. विजेच्या वेळी, कोणत्याही धातूच्या वस्तूभोवती उभे राहू नका, ताराजवळ जाऊ नका. खराब हवामानात जमिनीशी थेट संपर्क टाळा आणि खाट किंवा बेडवर रहा.

वीज पडल्यानंतर काय करायचे ?

बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना ते अगोदर तपासून पाहा. जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डीयक कॉम्प्रेशनचा वापर करा. अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहाव्यात, संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा. १०८ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग येईल याची अचूक माहिती द्यावा.





  Print






News - Bhandara




Related Photos