जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड काढण्यासाठी प्रभागस्तरावर शिबिराचे आयोजन करा : डॉ.ओमप्रकाश शेटे


- आयुष्मान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडे योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याची गरज आहे. यासाठी प्रभाग निहाय शिबिराचे आयोजन करावे. तसेच राशन दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत कार्ड काढण्यासाठी जनजागृती करावी, अशा सुचना आयुष्मान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्याात.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी आढावा घेण्यात आला, यावेळी त्यांनी सुचना केल्यात. बैठकीला आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत असलेल्या सर्व शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता सर्वच प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार उपलब्ध करून दिले जातात. योजनेत २ हजार ३९९ प्रकारचे गंभीर आजार व शस्त्रक्रीयांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच शत्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना सुट्टी झाल्यानंतर १० दिवसाच्या मोफत औषधोपचाराचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशनकार्ड आधार लिंक करुन १२ अंकी नोंदणी क्रमांक मिळविणे आवश्यक असून यासाठी पुरवठा विभागाचा मोठा सहभाग आवश्यक आहे. पुरवठा विभागाने जास्तीत जास्त राशन आधार लिंक करुन घ्यावे, जिल्ह्यात १२ लाख ३२ हजार २४१ नागरिकांचे उद्दिष्ट असून ६ लाख ५० हजार १४२ नागरिकांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. केवळ ५३ टक्के नागरिकांनी आधार प्रमाणीकरण केले असल्यामुळे आधार प्रमाणीकरण वाढविण्याची गरज असल्याचे डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले.
नागरिकांना घरबसल्या काढता येणार आयुष्मान भारत कार्ड -
केंद्र शासनाने नागरिकांना घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आयुष्मान सारथी ॲप विकसित केला असून ७२९०८२३८३८ या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर संदेश पाठवून योजनेच्या माहितीसह आयुष्मान भारत कार्ड काढता येणार आहे. तसेच नागरिकांना काही तक्रार नोंदवावयाची असल्यास १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. सोबतच नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित सर्व शासकीय रुग्णालय व आयुष्मान भारत योजनेंतर्गत समावेश असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ५ हजार १४५ विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी प्रकरणे प्राप्त झाली असून ४ हजार १०प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले असून यापैकी ७६ लाख रुपये संबंधित रुग्णालयाला वितरीत करण्यात आले आहे. तसेच ११ खाजगी रुग्णालयामार्फत ११ हजार ७९८ प्रकरणे प्राप्त झाली असून ९ हजार ५९७ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. यासाठी ४२ कोटी २९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून संबंधित खाजगी रुग्णालयांना २७ कोटी १९ लाख रुपयाचे वितरण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
आयुष्मान भारत कार्ड वितरणासाठी ४० दिवसाचा कार्यक्रम घ्या : समीर कुणावार -
आयुष्मान भारत योजनेच्या लाभापासुन जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये. प्रत्येकांकडे आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे यासाठी प्रशासन स्तरावर ४० दिवसाचा कार्यक्रम हाती घेऊन गावपातळीपर्यंत योजनेची जनजागृती करावी व प्रभाग निहाय शिबिराचे आयोजन करुन आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, अशा सुचना आमदार समीर कुणावार यांनी दिल्यात.




Petrol Price




