पावसाळयात संपर्क तुटणाऱ्या ८२ गावात १०० बेली- ब्रीज उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


-गडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी देणारे हे सरकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गेल्या चार वर्षात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.  मी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संधी मिळेल तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला आहे.  या जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी हे शासन कटिबध्द असून पावसाळयात जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या ८२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचे १०० बेली-ब्रीज उभारले जातील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
 गडचिरोली मधील सोनापूर येथे आज कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण, प्रमुख पुलांचे उद्घाटन, महामार्गांचे ई- भुमिपूजन व लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम स्थानिक कृषी  महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.  यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.  यावेळी राज्याचे वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी व्यासपिठावरुन बोलताना त्यांनी केंद्र व राज्य शासन शोषित, वंचित व गरिब लोकांना केंद्र स्थानी ठेवून लोकोपयोगी योजना आखत आहेत.  त्यामुळे वेगळया मार्गाने भटकलेल्या युवकांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आ. कीर्तीकुमार भांग‍डिया,न.प. अध्यक्ष योगिता पिपरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, भाजपाचे अल्पसंख्यक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, तसेच बाबूराव कोहळे आदींची उपस्थिती होती.
पुलवामा येथे आत्मघाती स्फोटात सी.आर.पी.एफ. चे ४० जवान ठार झाले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांचे स्वागत अगदी साधेपणाने कोणत्याही पुष्पगुच्छाविना शब्दसुमनांनी करण्यात आले.  मुख्य समारंभ सुरु होण्यापूर्वी या शहीदांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दोन मिनिटे मौन राखून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. भारावलेल्या गडचिरोलीकरांनी यानंतर 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या.
 यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हयामध्ये  विपूल वनसंपदा असल्यामुळे मुबलक पाणी असतानासुध्दा मोठे सिंचन प्रकल्प उभे करता येत नसल्याचे स्पष्ट केले.  त्यामुळे  गेल्या चार वर्षात केंद्रीत सिंचनाकडे लक्ष देतांना ११ हजार विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आल्या.  विहिरी, शेततळे, छोटे पुल कम बंधारे यामाध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे.  विहिरी सोबतच  मोटर पंप, वीज जोडणी नियमित मिळेल याकडे लक्ष वेधले आहे.  कृषी विद्यापीठाच्या या ठिकाणच्या महाविद्यालयातून जिल्ह्याला पुरक ठरेल अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 पावसाळ्यात या  जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावाना बेली-ब्रिज व्दारे जोडण्यात येईल.   या गावांचा विकास थांबता कामा नये.  सोबतच जिल्ह्यातील गोदावरी सोबतच आता प्राणहिता , इंद्रावती या नदीवरील पुलांचे काम लवकरच पुर्णत्वास येईल, असे त्यांनी सांगितले. 
 आमदार डॉ. देवराव होळी यांनी मांडलेल्या मेक इन गडचिरोली संकल्पनेला त्यांनी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.  या भागात मोठे उद्योग उभे राहीले की, रोजगाराला निश्चितच चालना मिळणार आहे.  त्यामुळे मेक इन गडचिरोली मोहिमेचे आपण स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, असंघटीत कामगारांना ३ हजार निवृत्तीवेतन देणारी योजना, किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार देण्यासाठी देश पातळीवर ७५ हजार कोटीची केलेली तरतूद, उज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला गॅस जोडणी, घराघरात वीज, आदी. योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.  आवास योजनेच्या माध्यमातून २०२२ पर्यंत देशात सर्वांना घरे देण्याचा त्यांचा उद्देश आहे. तथापि, महाराष्ट्रात २०२० पर्यंत सर्वांनाच घरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यानी सांगितले.  गडचिरोली जिल्ह्यातील पेसा गावामध्ये आदीवासी सोबतच ओबीसीना देखील सवलती मिळण्याबाबत ट्रायबल ॲडव्हसरी कमेटीने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीच्या माध्यमातून ओबीसींना देखील आरक्षण दिले जाईल.  ओबीसींच्या न्याय्य हक्काचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.  
 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विपूल वनसंपदा, मुबलक पाणी, खनिज संपदा बघता हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असायला  पाहिजे होता, मात्र दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहीला म्हणून गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण स्वत: या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष वेधत असल्याचे सांगितले. 
 कृषि विद्यापीठाच्या चार भिंतीतले संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शिवारात बरकत आणण्यासाठी कामी आले पाहीजे असे आवाहन त्यानी केले. ज्या गोष्टीमुळे आयात कमी होऊ शकते, मुबलक पैसा मिळू शकते, सामान्यांच्या आयुष्यात समाधान येऊ शकते त्या पिकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य देण्याबाबतची सूचना त्यानी दिली.  सोबतच जिल्ह्यात कोणते प्रयोग केल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होईल या संदर्भातील योजना जिल्हा नियोजनातून तयार करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले. 
 आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत,  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कठाणी नदीवरील पूलाचे लोकार्पण केले.  यासोबतच आमगाव ते आलापल्ली, ब्रम्हपूरी ते धानोरा महामार्गाचे भुमिपूजन केले.  जिल्ह्यामधल्या गती -२ योजनेअंतर्गत युवकांना ५० हजार रुपयाच्या गुंतवणूकीवर स्टँडअप इंडिया अंतर्गत २० लाभार्थ्यांना टाटा ट्रक ४० टक्के सबसिडीवर देण्यात आला.  लॉयडस् स्टिल तथा खनिकर्म निधीतून ही मोहिम राबविण्यात येत आहे.  याप्रसंगी लॉयडस् चे अतुल खाडिलकर यांचीही उपस्थिती होती.

विकासाचा वेग वाढला

 शासनाने गडचिरोलीतील विकास हा प्राधान्याचा विषय मानला आणि त्यामुळे ४ वर्षात मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रातील योजनांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पुढाकार घेतला त्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे. या बद्दल मी दोघांचेही आभार याप्रसंगी मानतो या शब्दात पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 गडचिरोली जिल्हयात १२ हजार कोटींचे रस्ते होत आहेत. हे प्रथमच घडत आहे. गेल्या २० वर्षात बांधलेच गेले नाहीत अशा भागात रस्ते होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हजार कोटी मंजूर करुन रस्त्यांची कामे होत आहेत. जिल्हयात प्रत्येक गावात वीज पुरवठा गेल्या ३ वर्षात झाला सोबतच पाणी पुरवठा व इतर कामेही मोठया प्रमाणावर होत आहेत असे ते म्हणाले.
 कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून या जिल्हयातील शेतकऱ्यांना नवे तंत्र व शेतीची माहिती होवून उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. सोबतच अहेरी येथील रुग्णालय उभारणीच्या निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांनी आभार मानले.
 यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी मनोगत व्यक्त केले.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी आपल्या रसाळ वाणीने ओघवत्या भाषेत केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-18


Related Photos