महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिक विद्यालयात  भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे भारतीय वायुसेना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय वायुसैनिकांच्या शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रसेवेला यावेळी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांना मानवंदना देऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भारतीय वायुसेनेचा गौरवशाली इतिहास, युद्धातील कामगिरी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी व आपत्तीच्या काळात वायुसैनिक बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत माहिती सादर केली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे,हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा.गजानन ढोले, सैनिकी निदेशक हरिप्रसाद ध्यानी हे होते. 

तसेच संपूर्ण शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.  प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय वायुसेना ही देशाच्या सामर्थ्याची, शौर्याची आणि अभिमानाची प्रतीक आहे. देशाच्या आकाशाचे रक्षण करताना वायुसैनिक अत्यंत कठीण परिस्थितीतही धैर्याने आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावतात. त्यांच्या त्याग, शिस्त आणि राष्ट्रसेवेपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी.

वायुसेनेत सेवा करणे म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याचे महान कार्य आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करावेत. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सैनिक, अधिकारी, वैज्ञानिक आणि राष्ट्रनिर्माते घडत असतात.

देश आपल्याला काय देतो यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने मनात रुजवावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले. भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशसेवेचे स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी आजपासूनच प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. भारतीय वायुसेनेतील विविध संधी, अधिकारी व जवानांचे जीवन, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रसेवेची भावना याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.काही जण आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सीमांचे रक्षण करतात; काही जण आपण पाहत असलेल्या आकाशाचे रक्षण करतात; आणि काही जण आपली स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांचे रक्षण करतात,या भावपूर्ण संदेशातून विद्यार्थ्यांनी वायुसैनिकांच्या त्यागाला सलाम केला.

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली. भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रहीम पटेल यांनी केले तर आभार योगेश आसमवार यांनी मानले

 





  Print






Related Photos