शाळा परिसर तंबाखूमुक्त करा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश लसीकरणाला गती द्यावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तातडीने तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आरोग्य विभागाला दिले. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख आरोग्याबाबत जनजागृतीवर भर -
राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तंबाखू व अन्य व्यसनांमुळे होणाऱ्या मुखाच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे ओळखण्यासाठी तपासणी मोहिमा प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये -
जिल्ह्यातील नियमित लसीकरण कार्यक्रमाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. बालके तसेच गरोदर महिलांना वेळेत लसीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी सूक्ष्म नियोजन करून विशेष मोहीम राबवावी. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिल्या.




Petrol Price




