महत्वाच्या बातम्या

 स्वीडनमधील ग्राहकाला बनावट औषधांची विक्री


- नागपुरातील स्कायलाईन इम्पेक्सवर गुन्हा; एमओटीएस-सीमध्ये सक्रिय औषधी घटकच नसल्याचे उघड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : स्वीडनमधील ग्राहकाला बनावट लेबल लावलेली एमओटीएस-सी औषधे विकल्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत उघडकीस आला आहे. संबंधित औषधाचा नमुना परदेशातील प्रयोगशाळेत तपासला असता त्यात सक्रिय औषधी घटक आढळला नसल्याचे समोर आले. या प्रकरणी नागपूर येथील स्कायलाईन इम्पेक्सचे भागीदार यश सेवेंद्र बेरी, पंजाबमधील कथित पुरवठादार मनहीर सिंग, कथित बोगस उत्पादक डॉ. ग्लेक्स फार्माकम तसेच इतर संबंधितांविरुद्ध जरीपटका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र एफडीएच्या नागपूर येथील औषध निरीक्षक स्वाती सुधाकर भरडे यांच्या तक्रारीनुसार, स्वीडनमधील एका ग्राहकाने इंडिया मार्टच्या माध्यमातून स्कायलाईन इम्पेक्सकडून एमओटीएस-सीसह विविध रिसर्च पेप्टाइड्स खरेदी केले होते. यापैकी एमओटीएस-सीचा नमुना परदेशातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यात सक्रिय औषधी घटक आढळला नसल्याचे स्पष्ट झाले.

पेप्टाइड सायन्सेस यूएसएच्या नावाने बनावट लेबल -
संबंधित एमओटीएस-सीवर पेप्टाइड सायन्सेस यूएसए या कंपनीच्या नावाने लेबल लावण्यात आले होते. मात्र, या कंपनीशी पडताळणी केल्यानंतर संबंधित लेबल आपल्या कंपनीचे नसून बनावट असल्याचे कंपनीने स्पष्ट केले अशी माहिती एफडीएच्या तक्रारीत नमूद आहे. यानंतर स्वीडनमधील ग्राहकाने या प्रकाराची तक्रार एफडीएकडे केली.

सीडीएससीओ-एफडीएचे संयुक्त पथक दाखल -
तक्रारीची दखल घेतल्यानंतर २५ जून रोजी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) आणि महाराष्ट्र एफडीएच्या संयुक्त पथकाने स्कायलाईन इम्पेक्स’ची तपासणी केली. या कारवाईत फर्ममधील औषधसाठा, खरेदी-विक्रीची कागदपत्रे तसेच संबंधित व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. तपासणीत सीजेसी इपामोरेलिन, टेसामोरेलिन, सोमाट्रोपिन आणि एमओटीएस-सी यांसह विविध पेप्टाइड्स बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचे समोर आल्याचे एफडीएने नमूद केले आहे.

१ लाख २० हजार ५०० रुपये आगाऊ घेतल्याचा आरोप -
तपासात स्वीडनमधील ग्राहकाकडून १ लाख २० हजार ५०० रुपये आगाऊ घेऊन माल पाठविण्यात आल्याचेही नमूद आहे. तसेच सीमाशुल्क टाळण्यासाठी मालाची किंमत प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा कमी दाखवून ती केवळ २०० अमेरिकन डॉलर नमूद केल्याचा आरोप आहे.

इंजेक्शनसाठीचे पाणी गुणवत्ता चाचणीत अपयशी -
तपासणीदरम्यान बॅक्टेरिओस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन या उत्पादनाच्या साठ्यातील नमुने घेण्यात आले. प्रयोगशाळेतील गुणवत्ता चाचणीत हे नमुने अपयशी ठरल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कथित उत्पादकाचा पत्ताही बनावट -
या व्यवहारात उत्पादक म्हणून नमूद करण्यात आलेल्या डॉ. ग्लेक्स फार्माकमचा नमूद पत्ताही तपासणीदरम्यान बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे औषधांचा प्रत्यक्ष उत्पादक कोण, त्यांचा पुरवठा कुठून झाला आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

स्कायलाईन इम्पेक्सचे दोन्ही परवाने रद्द -
एफडीएच्या कारवाईनंतर स्कायलाईन इम्पेक्सचे दोन्ही औषधविक्री परवाने रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बनावट लेबलचा कथित वापर, सक्रिय औषधी घटक नसलेले उत्पादन, गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेले इंजेक्शनसाठीचे पाणी आणि कथित बोगस उत्पादकाचा पत्ता यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.  या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास जरीपटका पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos