महत्वाच्या बातम्या

 बॉम्बस्फोटाची डेटलाइन आज : धमकीमुळे शाळांमध्ये डे-नाइट बंदोबस्त


 १९ ठिकाणांना धमकीचा ई-मेल; डोन्ट टेक रिस्कच्या भूमिकेत शाळा, अनेकांनी परीक्षा पुढे ढकलल्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / नागपूर : शहरातील शाळा, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका इमारत अशा एकूण १९ महत्त्वाच्या ठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी वाढवली आहे. धमकीची डेटलाइन आज असल्याने संबंधित ठिकाणी दिवसरात्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वानपथकाच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जात आहे.

१९ ऑगस्ट रोजी कमांडो फोर्सच्या नावाने हा धमकीचा ई-मेल संबंधित संस्था आणि काही शाळांना प्राप्त झाला होता. ई-मेलमध्ये ३१ ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याने त्याच दिवशी शहरात एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर पोलिस प्रशासनाने तातडीने तपास सुरू करून संबंधित सर्व ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवली.

ई-मेलमध्ये खलिस्तान ग्रुप आणि बब्बर खालसा यांसारख्या नावांचा उल्लेख असल्याने सुरक्षायंत्रणांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठविला, त्यामागील उद्देश काय आणि हा केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की प्रत्यक्ष धोका आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शाळांची डोन्ट टेक रिस्कची भूमिका -
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यापासून शहरातील शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अनेक शाळांनी डोन्ट टेक रिस्क अशी भूमिका घेतली आहे. ३१ ऑगस्टची तारीख लक्षात घेता काही शाळांनी नियोजित अंतर्गत परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर काही शाळांनी आजचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

धमकी खरी असो अथवा केवळ अफवा पसरविण्याचा प्रयत्न असो, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेण्यास शाळा प्रशासन तयार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा सुरू ठेवण्याबाबत पालक आणि व्यवस्थापनांमध्ये चर्चा सुरू होती. काही शाळांनी परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांकडून दररोज तपासणी -
धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यापासून पोलिस प्रशासनाने संबंधित १९ ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने संबंधित ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद वस्तू किंवा हालचाली आढळल्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांच्या माहितीनुसार, धमकी प्राप्त झालेल्या सर्व १९ ठिकाणी दररोज सुरक्षा तपासणी केली जात आहे. तसेच डेटलाइन लक्षात घेऊन आज सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे.

पालकांमध्येही धाकधूक -
बॉम्बस्फोटाच्या धमकीची माहिती समोर आल्यानंतर पालकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुलांना शाळेत पाठवावे की नाही, याबाबत अनेक पालक संभ्रमात आहेत. शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारल्याने काही प्रमाणात पालकांना दिलासा मिळाला असला तरी धमकीचा स्रोत शोधून त्यामागील सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ३१ ऑगस्टची डेटलाइन लक्षात घेता नागपूर शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची विशेष नजर असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.





  Print






Related Photos