संविधानाची मूल्ये आणि लोकशाहीमुळे देश प्रगतीपथावर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे


-सांस्कृतिक कार्यक्रम ठरले आकर्षण
-विविध पुरस्कारांचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /    नागपूर  :
संविधानातील सर्वसमावेशक धोरण, मूल्ये आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात सामाजिक एकतेच्या माध्यमातून आज भारत देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 कस्तूरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा आयेाजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण  झाले. 
 यावेळी पोलिस दलातील विविध शसस्त्र दलांनी पथसंचलन करत मानवंदना दिली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर उपस्थिती होते.
 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचे कार्य यशस्वीपणे सुरु आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आदी उपाययोजना राबविण्याचे प्राधान्य देण्यात आले असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रथमच २१ हजार ५०० कोटींची कर्जमाफी दिली आहे. कृषी व सिंचन या दोन्ही विभागांना प्राधान्य देण्यात आले असून २०१४ ते २०१८ या काळात २२ हजार १९९ कोटी केवळ शेती विकासावर खर्च करण्यात आले. तसेच मागील चार वर्षात १४ हजार ६९१ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना थेट मदत दिली आहे. शेतकऱ्यांना मागील चार वर्षात ५१ हजार २४२ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ६८ हजार १६० शेतकरी खातेधारकांना ४२४ कोटी ६० लक्ष रुपयांचे कर्ज माफी देण्यात आले आहे. 
 शिक्षण, पर्यटन, आरोग्य, उद्योग व कौशल्य विकास या क्षेत्रातील वाटचाली बाबत श्री. बावनकुळे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगल्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पर्यटन स्थळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच ड्रॅगन पॅलेस, चिंचोली- शांती वन, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ,कोराडी, हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा, रामटेक येथील गडमंदिर, पारडसिंगा येथील सती अनुसया माता देवस्थान  यांचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे. 
 समाजातील निराधार व गरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्यासाठीच्या खर्चात मागील चार वर्षात ४४७ कोटी ४७ लाख रुपये एवढी भरीव वाढ केली आहे. सरकारी रुग्णालयावरील विश्वासात वाढ करण्यासोबतच माता मृत्यू दर कमी करण्यामुळे महाराष्ट्र हा देशात दुसरा स्थानावर आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात २५ हजार ते ३ लाखापर्यंतची मदत गरजूंना देण्यात येत आहे. यासाठी नागपूर येथेही हा कक्ष सुरु करण्यात आल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. 
 जलयुक्त शिवार ही राज्याची प्रमुख अग्रक्रम असलेली योजना असून लोकसहभागातून १६ हजार ५२२ गावात ५ लाख ५७ हजार कामे पूर्ण झाली आहेत. सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे धोरण असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागातही नागपूर सुधार प्रन्यास, महानगर पालिका तसेच म्हाडातर्फे मोठ्या प्रमाणात घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. कौशल्य विकास विभागातंर्गत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून विभागात २१ हजार ४४६ युवकांना  प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी १२ हजार ९५१ उमेदवारांना नोकरी तर १  हजार ३५१ उमेदवारांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.
 नागपूर शहर हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकल्पात मेट्रो, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थाना जागा दिली असून त्या सर्व संस्था सुरु झाल्या आहेत. या प्रकल्पांनाही जनतेचे चांगले सहकार्य मिळत असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
 यावेळी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्तम कामगिरी  बजावणारे नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे यांना सन्मानित करण्यात आले. पोलिस प्रफुल्ल पुंडलिक चिंतले  यांना नक्षल चकमकीत यश मिळविल्याबद्दल ‘पराक्रम पदक’ प्रदान करण्यात आले. कठीण व खडतर कामगिरी बद्दल अशोक नारायण कोमटी यांना ‘विशेष सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. दिवंगत ज्ञानेश्वर राजाराम उईके यांचा ‘विशेष सेवा पदक’ त्यांची पत्नी रिमा उईके यांना प्रदान करण्यात आला. नागपूरचे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील विनोद शिवप्रसाद तिवारी यांना उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षक पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
 परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, नागपूर ग्रामीणचे कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वात तालबद्ध व शिस्तबद्ध पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले. पथ संचलनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या प्रहार सैनिकी शाळा मुलींचे पथक यांना प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार राष्ट्रीय छात्र सेनेचे वायुदलाचे पथक तर तृतीय पुरस्कार प्रहार सैनिकी मुलांची शाळा यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, नागपूर सुधार प्रन्यास श्रीमती शितल उगले, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त ऋषिकेश मोडक, अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, लोकप्रतिनिधी तसेच स्वातंत्र्य सैनिक यादवराव देवगडे, भारतीय सेना दलाचे वरिष्ठ अधिकारी, न्यायमूर्ती व पोलिस अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, योग प्रात्याक्षिके अशा रंगारंग कार्यक्रम सादर करुन उपस्थितांचे दाद मिळविली. कार्यक्रमाचे संचालन व समालोचन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळीवकर यांनी केले.
 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-01-27


Related Photos