सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी व्हावेत यासाठी सर्व आमदारांना लवकरच आचारसंहिता


- लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
विधानसभांतील कामकाज सुरळीत चालावे, आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी व्हावेत, या हेतूने सर्व आमदारांसाठी लवकरच आचारसंहिता तयार केली जाईल, अशी घोषणा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी  केली. ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल, असेही बिर्ला यांनी सांगितले. 
या संदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून तीसहून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याची माहिती देताना बिर्ला म्हणाले, 'ही बैठक अत्यंत यशस्वी झाली. विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले. सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. 
दोन्ही सभागृहांतील खासदारांसाठीही आचारसंहिता बनविण्याचे सूतोवाचही बिर्ला यांनी यापूर्वी केले आहे. विधानसभांचे डिजिटायझेशन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यासाठीही एक समिती नेमण्यात येणार असल्याचीही माहिती बिर्ला यांनी दिली.    Print


News - World | Posted : 2019-08-29


Related Photos