महाराष्ट्रात थंडीसह पावसाची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात उत्तरेच्या थंडीचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी ढगाळ आकाश तर काही ठिकाणी पाऊस आणि धुक्यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली होती. दरम्यान काही ठिकाणी थंडी कमी झाली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा तडाकाही वाढला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान उत्तरेतील काही राज्यात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील काही भागात होण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ हवामान होत आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे धुके कमी झाले आहे. काल दिवसभर अनेक भागांत जोरदार वारे वाहत होते. किमान तापमानातील वाढ कायम असल्याने बुधवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 13 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातही वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) बुधवारी रात्री श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्याला धडकले. ही प्रणाली नैर्ऋत्य दिशेकडे जात असून, तिच्या प्रभावामुळे तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप बेटांवर विजांसह पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. बुधवारी राजस्थानच्या बिकानेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 30.5 (20.8), धुळे 28.5 (12.0), कोल्हापूर 30.5 (20.8), महाबळेश्वर 25.7 (13.6), नाशिक 29 .8 (16.7), निफाड 29.2 (12.0), सांगली 31.4 (19.1), सातारा 30.6 (19.1), सोलापूर 32.6 (20.5), रत्नागिरी 34.0 (21.0), औरंगाबाद 30.4 (14.2), अकोला 32 .5 (16.3), अमरावती 32.8 (16.1), बुलडाणा 29.2 (15.4), चंद्रपूर (18.2), गडचिरोली 32 .0(15.6), गोंदिया 31.5(16.0), नागपूर 31.5 (17.6), वर्धा 31.5(17.6), यवतमाळ 31.2 (17.5) तापमानाची नोंद झाली.
News - Rajy