महत्वाच्या बातम्या

 थकीत कोरोना भत्ता दुसरी महामारी आल्यानंतर देणार काय? अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांचा संताप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि अंशकालीन स्त्री परिचर यांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नाही. तब्बल साडेपाच वर्षांपासून हा भत्ता प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सीटूच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर पंचायत समितीवर मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला.

मार्च २०२० ते मार्च २०२२ या कोरोना महामारीच्या काळात लागू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि अंशकालीन स्त्री परिचर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडली. नियमित मानधनाव्यतिरिक्त दरमहा एक हजार रुपये प्रमाणे कोरोना महामारी संपेपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, अशी पत्रके आयुक्तालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरून काढण्यात आली होती.

मात्र या कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला संपूर्ण भत्ता अद्याप मिळालेला नसून सुमारे २३ हजार रुपये थकीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा रेल्वे डिव्हायडरवरून वळसा घेत बल्लारपूर पंचायत समिती कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी थकीत कोरोना भत्ता तातडीने देण्याची मागणी केली. मोर्चाला संबोधित करताना प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी, साडेपाच वर्षांपासून कोरोना काळातील थकीत भत्ता मिळत नसेल, तर हा भत्ता दुसरी महामारी आल्यानंतर देणार काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा शासनाने योग्य सन्मान करावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रसिद्ध कादंबरीकार पवन भगत यांनीही आंदोलनाला मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळात जनतेचे झालेले हाल आपण प्रत्यक्ष अनुभवले असून, त्या अनुभवाच्या आधारे ५० दिवस ही कादंबरी लिहिल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात अंगणवाडी महिला आणि आशा वर्कर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले. त्यामुळे त्यांच्या हक्काचा प्रोत्साहन भत्ता देण्यास शासनाने विलंब करू नये, असे त्यांनी नमूद केले. मोर्चाचे नेतृत्व प्रा. रमेशचंद्र दहिवडे, कॉ. अरुण भेलके आणि लेखक पवन भगत यांनी केले. यावेळी अ‍ॅड. सय्यद, नरेंद्र सोनारकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी रेखा रामटेके, वर्षा कायरकर, सरिता कामटवार आणि कुंदा पावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.





  Print






Related Photos