महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्याचा मृत्यू

- १९ वर्षांच्या बिबट्याने घेतला अखेरचा श्वास; हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शहरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयात गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी एका मादी बिबट्याचा अचानक मृत्यू झाला. सुमारे १९ वर्षे वय असलेल्या या बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांच्या संख्येत घट झाली आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मादी बिबट्याला ८ जानेवारी २००९ रोजी चंद्रपूरच्या जंगलातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. तेव्हापासून ती याच प्राणिसंग्रहालयात होती. गुरुवारी सकाळी तिचा अचानक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने नियमानुसार वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली.
बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीयदृष्ट्या तपासण्यासाठी प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय निष्कर्षानुसार हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षांपासून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात असलेल्या या मादी बिबट्याच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




