महत्वाच्या बातम्या

 तालुकास्तरावर होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, स्तरावर राबविण्यात येणार आहे. 

त्याअनुषंगाने महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण तालुका स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता अधिकारी / कर्मचारी यांची कार्यक्रम देखरेख तथा नियंत्रण समिती सुदधा गठीत करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावर तहसिलदार यांना अध्यक्ष, व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सदस्य सचिव, म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. 

सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर फ्लॅगशिप कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयात तालुकानिहाय १ मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान राबविण्या संदर्भात नियोजन करण्यात आलेले आहे. 

सदर कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय प्रमुख हे सदर कार्यक्रमात सहभागी होणार असून त्या त्याविभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने स्टॉल लावुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे तसेच शिबीरस्थळी प्राप्त होणाऱ्या महिलांच्या तक्रारींचे निवारण संबंधीत विभागाने शक्यतो तिथेच करणार आहेत व प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रार अर्जाची विभागाव्दारे नोंद घेवून त्याचे निराकरण तातडीने करण्यात येणार आहे. 

शिबीराच्या अनुषंगाने संबंधीत तालुक्यातील तहसिल कार्यालय किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन होणाऱ्या तालुकास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेवून आपल्या तक्रारी / समस्या नोंदविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos