भंडाऱ्याच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त


- अनधिकृत वाहनतळ, रिक्षांची बेशिस्त गर्दी आणि चारचाकींची वर्दळ; लक्ष्मी साडी सेंटर ते रंगोली साडी सेंटरपर्यंत अर्धा तास वाहतूक ठप्प
विदर्भ न्यूज एक्सपरीस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाहनचालकांसह पादचारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना अनधिकृत वाहनतळ, रिक्षांची बेशिस्त गर्दी आणि चारचाकी वाहनांची वाढती वर्दळ यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत आहे. वाहतूक पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोस्ट ऑफिस चौकातून शहराच्या मुख्य बाजारपेठेकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने आधीच अरुंद असलेल्या मार्गावर वाहतुकीसाठी पुरेशी जागा राहत नाही. त्यातच रिक्षाचालकांची गर्दी आणि चारचाकी वाहनांची बेशिस्त वर्दळ यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढल्याने ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. सायंकाळच्या सुमारास लक्ष्मी साडी सेंटरपासून रंगोली साडी सेंटरपर्यंतचा मार्ग तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकला होता. त्यामुळे वाहनचालकांना बराच वेळ एकाच ठिकाणी थांबावे लागले. पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह खरेदीसाठी आलेल्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय झाली. दुकानदारांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा अभाव -
सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या प्रवेशाचे नियोजन आणि पार्किंगची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, अशा प्रकारचे प्रभावी नियोजन दिसून येत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी -
पोस्ट ऑफिस चौक ते गांधी चौक या दरम्यान गर्दीच्या वेळेत चारचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या प्रवेशावर आवश्यक निर्बंध घालावेत, रस्त्यावरील अनधिकृत वाहनतळ तातडीने हटवावेत तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करणेही आवश्यक आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी वाहतूक विभाग आणि नगर प्रशासनाने समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात. केवळ वाहतूक पोलिसांची उपस्थिती न ठेवता प्रत्यक्ष वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा भंडारावासीयांकडून व्यक्त होत आहे.




Petrol Price




