महत्वाच्या बातम्या

 जातीयवादी काँग्रेसला कर्नाटकात पराभूत करा : मंत्री सुधीर मुनगंटीवार


- कर्नाटकच्या देवर हिप्परगी मतदार संघात प्रचाराचा झंझावात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी मतदार संघाचे भाजपा उमेदवार सुमनगौडा पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसीय झंझावाती प्रचार दौरा केला.  कार्यकर्ता संवाद, जनसंपर्क यात्रा, पत्रकार परिषद आणि जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन केले.
विजयपूर येथे बुधवारी आगमन झाल्यानंतर विजयपूर जिल्हा भाजपाच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मतदार संघातील सलोडगी, गुगिहाळ या गावात जाहीर सभा झाल्या. तर या दोन गावांसह हुवीन हिप्परगी गावात स्थानिक कार्यकर्त्यांसह घरोघरी मतदार संपर्क करून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रचार सभा, कार्यकर्ता संवाद आणि पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पार्टीचे वैशिष्ट्य मांडतांना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा राष्ट्रीय अस्मिता आणि विकासासाठी समर्पित पक्ष असल्याचे सांगितले. भाजपा ही जातीयवादी पार्टी असल्याचा दुष्प्रचार विरोधक करताहेत तो थांबविण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहन करुन कॉंग्रेसने देशात जातीयवाद आणि धार्मिक वादाला खतपाणी घातल्याचा आरोप ना. मुनगंटीवार यांनी केला. कर्नाटकमध्ये येडियुरप्पा आणि बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी यांच्याकरिता कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी देश सर्वोपरि मानून गरीब माणसांपर्यंत योजना पोहोचविल्या आहेत; त्या योजना आणि देशभक्ती चा विचार कर्नाटकात भाजपाला मोठे यश देईल असा विश्वास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
२७ एप्रिल रोजी सकाळी जिल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस काळातील रखडलेला विकास आणि भाजपाच्या काळात विकासाला मिळालेली गती यांची आकडेवारीसह तुलना सादर केली. विजयपूर जिल्ह्यातील भाजपाच्या सोमनगौडा पाटील (देवर हिप्परगी), बसनगौडा पाटील (विजयपूर), ए.एस.पाटील (मुद्देबिहाळ), बिजुगौडा पाटील (बबलेश्वर), एस.के. बेळुब्बी (बसवन बागेवाडी), कासुगौडा बिरादार (इंडी), रमेश भुसनूर (सिंदगी) आणि संजय ऐहोळे (नागठाण) या आठही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विजयपूर जिल्ह्यातील जनतेला केले.
गुरूवारी दुपारी हुवीन हिप्परगी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जोरदार पदयात्रा काढली. हुवीन हुप्परगि येथेच परमानंद मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. पदयात्रेत मतदारांशी थेट संपर्क साधून ना. मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टी च्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले. त्यानंतर कोरवार येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तेथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्या सोबत उत्तर प्रदेश चे माजी मंत्री आनंद स्वरूप शुक्ला, डॉ बी. एस. गौडा पाटील यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos