निवडणूकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठीचे ग्रामसेवक मेना यांच्यावर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
विधानसभा निवडणूकीच्या कामात महत्वाची जबाबदारी देवून नेमणूक केल्यानंतर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस.बी. मेना यांच्यावर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास अंडील यांच्या आदेशानुसार भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यानुसार ग्रामसेवक मेना यांच्यावर कलम १७४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार अंडील यांच्या आदेशावरून तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक वसंता गोपाल कुंभरे यांनी काल १६ ऑक्टोबर रोजी भामरागड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर च्या आदेशानुसार ग्रामसेवक एस.बी. मेना यांची विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेत नेमणूक करण्यात आली होती. यानुसार २४ सप्टेंबर रोजी भामरागड पंचायत समितीच्या आस्थापनेवरून भारमुक्त करून तहसील कार्यालयात पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. ग्रामसेवक मेना यांना २५ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात नेमून दिलेल्या कामासाठी हजर होणे आवश्यक होते. मात्र ४ ऑक्टोबर पर्यंत ते निवडणूक विभागात रूजू झाले नाहीत. यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पंचायत समितीकडून १० ऑक्टोबर रोजी नोटीस तामील करून पोच पावती भामरागड तहसील कार्यालयास देण्यात आली. यानंतर काल १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार अंडील यांच्या आदेशानुसार भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ग्रामसेवक मेना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-17


Related Photos